Breaking News

कर्जवाटपात गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाई करणार आर्थिक मागास विकास महामंडळाचे पाटील यांचा इशारा


शिर्डी/प्रतिनिधी ः
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कर्जवितरण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे. यात कोणाचाही हस्तक्षेप नसल्याने सर्व कारभार पारदर्शीपणे केला जात आहे. महामंडळाच्या माध्यमातून घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे फेडावे, असे आवाहन करतानाच महामंडळाच्या कर्जवाटप प्रकरणामध्ये गैरप्रकार करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचा इशारा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला.
पाटील यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेतली. महामंडळाचे जिल्हा समन्वयक अरूण निमसे, सचिन चौगुले, देवेंद्र लांबे, नितीन पाटील यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, उत्तर नगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले व नेवासा तालुक्यात दौरा केला आहे. या ठिकाणी लाभार्थी व संबंधित बँकेचे अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे. ज्यांनी प्रकरणे सादर केली आहेत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. बँकेच्या अधिकार्‍यांना याबाबत आदेश करण्यात आले आहेत. सप्टेंबर 2018 पासून महामंडळातर्फे 14 हजार 921 लाभार्थी प्रकरणे मंजूर केली आहेत. 906 कोटी 36 लाख 11 हजार 160 रुपये कर्ज वितरीत केले आहे. महामंडळाच्या वतीने दिल्या जाणार्‍या कर्जाची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीची आहे. यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नाही. अर्जदारांनी कर्ज प्रकरण मंजूर होण्यासाठी सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर प्रकरण मंजूर होण्यामध्ये अडचणी येतात. महामंडळाचे कामकाज यशस्वीपणे चालू आहे.
काही ठिकाणी बँक अधिकार्‍यांना महामंडळाच्या प्रकरणाबद्दल अपूर्ण माहिती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्वतः तालुका स्तरावर दौरे केले. बँक अधिकार्‍यांना या दौर्‍यांमध्ये सहभागी करून घेतले. या दौर्‍याप्रसंगी अनुपस्थित बँक अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महामंडळ तालुका व जिल्हा प्रशासनाची मदत घेणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.