Breaking News

कोपरगावमध्ये बचतगटांना कर्जाचे वाटप


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी ः 
येथील 18 महिला बचतगटांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा बँकेच्या वतीने 29 लाख 92 हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.
      येथील कृष्णाई मंगल कार्यालयात महिला मेळाव्यात हे कर्जवितरण झाले. कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचत गट संस्थेच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी उपस्थित होत्या. 
रेणुका कोल्हे म्हणाल्या, जागतिक महिला दिनी महिला एकत्रित येऊन आपल्या सुखदुःखाची चर्चा करतात. अडचणीतून मार्ग कसा काढायचा याबाबत सल्लामसलत करतात. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पुढाकार घेऊन येथील महिलांना बचतीची सवय लावली. त्यातून संसाराचा गाडा चालवण्याचे कसब त्या शिकल्या, असेही त्या म्हणाल्या. 
         माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या योजना उपेक्षित महिलांच्या दारी नेऊन त्यातून लाभ मिळवून देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत जाणीवपूर्वक प्रयत्न केले.   यापुढेही सामाजिक वसा चालू ठेवत त्यातून महिलांची आर्थिक, शैक्षणिक उन्नती साधण्याचा प्रयत्न आहे. बचतीची सवय प्रत्येक महिलेने अंगीकारावी. त्यातून बचतगट स्थापन करावे. संपूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी नेहमीच पुढाकार आहे. जागतिक महिला दिन ही एकत्रित येण्याची संधी आहे. महिलांनी घेतलेल्या कर्जाचा विनियोग व्यवस्थित करावा. बचतगटाचे कर्ज नियमित फेडावे, असेही त्या म्हणाल्या.