Breaking News

मुकींदपूरचा कीर्तन महोत्सव स्थगित सुनीलगिरी महाराज यांची माहिती


भेंडा/ प्रतिनिधी ः
करोना रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुकींदपूर येथे श्रीराम साधना आश्रमातील नियोजित कीर्तन महोत्सव स्थगित करण्यात आला आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने 27 मार्चपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु शासनाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम स्थगित केल्याचे साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांनी सांगितले.
सुनीलगिरी महाराज म्हणाले, श्रीराम जन्मोत्सवानिमित्त महंतांच्या उपस्थितीमध्ये 27 मार्च ते तीन एप्रिलपर्यंत कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजे छत्रपती शिवाजी महाराज व शूरवीर मावळे यांची संगीतचरित्र कथाही होणार होती.
 परंतु करोना या रोगाच्य पार्श्‍वभूमीवर सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. त्यानुसार महोत्सवाच्या गर्दीचा विचार करुन हा महोत्सव स्थगित करण्यात आल्याचेही महाराजांनी सांगितले.
भास्करगिरी बाबांनी केलेल्या सूचनेनुसार फक्त श्रीराम जन्मोत्सवाचा उत्सव रामनवमीच्या दिवशी एक दिवसाकरता साजरा केला जाईल. या सोहळ्याकरिता नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही तालुक्यांमध्येही बॅनर लावण्यात आले होते. सोहळ्यासाठी एकूण 40 ते 45 लाखांचा खर्च होणार होता. या सोहळ्यासाठी मंडप उभारणीकरिता नियोजित जागेवर सांगाडेही उभे करण्यात आले होते. यासाठी आतापर्यंत सुमारे सहा लाखांचा खर्च झाला आहे.
 तो तोटा सहन करावा लागत आहे. आतापर्यंत या सोहळ्यासाठी दोन लाख 75 हजार एवढी वर्गणी जमा झाली आहे. वरील रक्कम फेडण्यासाठी वर्गणीतील पैसे येतील तेव्हा ते दिले जाणार आहेत. यातील आलेल्या देणगीतील निधी उरला तर तो निधी नियोजित श्रीराम बहुउद्देशीय हॉल बांधण्यासाठी जमा करण्यात येईल, असेही महाराजांनी यावेळी सांगितले.
      यावेळी मुक्ताई आश्रमाचे महंत गोपालानंदगिरी महाराज, माजी सरपंच भिवाजी आघाव, पोलिस उपनिरीक्षक संजूबाबा गायकवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, सीताराम निपुंगे, पोपटराव निपुंगे, लक्ष्मीनारायण जोंधळे, शिवाजी मिसाळ, राजू पठाण, शरद क्षीरसागर, पंडितराव पवार, श्यामराव कुर्‍हे, महेंद्र कानडे उपस्थित होते.