Breaking News

भारतीय स्त्री अबला नाही सबला ः डॉ. खेडेकर संगमनेर महाविद्यालयात महिला दिन


संगमनेर/ प्रतिनिधी ः
भारत हा नवदुर्गेची पूजा करणा-या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा सहभाग असतो. मुळात स्त्री ही संस्काराचा आणि सृजनाचा आविष्कार आहे. भारतीय स्त्री अबला नसून ती मुळातच सबला आहे, असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयात आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. के. देशमुख होते. महिला तक्रार निवारण समितीच्या महाविद्यालयीन समन्वयक  डॉ. राजेश्‍वरी ओझा, डॉ. संगीता जाधव यावेळी उपस्थित होते.
डॉ. खेडेकर म्हणाल्या, आजमितीला समाजात पावलोपावली स्त्रीयांवर होणारे अमानुष अत्याचार, छेडछाड, बलात्कार या बाबी सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेला गालबोट लावणार्‍या आहेत. प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने स्वावलंबी झाले पाहिजे. त्यांनी सक्षम आणि धाडसी होऊन आलेल्या प्रसंगाला योग्य तो प्रतिकार करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे स्वसंरक्षणाचे धडे दिले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी स्त्रीयांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रातील स्थान आणि योगदान स्पष्ट केले. अगदी गरीब परिस्थितीतील स्त्रियांपासून ते उच्च शिक्षीत, श्रीमंत कुटुंबातील स्त्रियांपर्यंत प्रत्येक स्त्रीही केवळ व्यक्ती नसून शक्ती आहे. तिच्या अस्तित्वाशिवाय समाज अपूर्ण आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. राजेश्‍वरी ओझा व डॉ. सीमा बोरगावे यांनी विद्यार्थिंनींना महिला सुरक्षाकायदा-2015 विषयी माहिती दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्फत दिल्या जाणा-या विविध शिष्यवृत्तींची माहितीही यावेळी देण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंवेवकांनी महिला सशक्तीकरण व जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक डॉ. राजेश्‍वरी ओझा यांनी केले. निवेदन इंदिरा अंदेला यांनी केले. डॉ. गीतांजली चिने यांनी सूत्रसंचालन केले.  डॉ. संगीता जाधव यांनी आभार मानले.