Breaking News

पैशांसाठी किती हा बेबनाव? मात्र पोलिसांनी भांड फोडलंच!


'मुजरिम कितना भी चालाक क्यों ना हो, वह पुलिस की नजरों से बच नही सकता', हिंदी चित्रपटातील सर्वांच्या परिचयाचा हा डायलॉग अहमदनगरच्या पोलिसांनी अखेर खरा करून दाखविला. महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्याच्या प्रकरणाचे वास्तव जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि तोफखान्याच्या पोलिसांनी संपूर्ण रात्र जागवत केले. मात्र पैशांच्या हव्यासापायी सदर दाम्पत्याने कितीही मोठा बेबनाव केला असला तरी चाणाक्ष पोलिसांच्या नजरेतून तो बनाव काही केल्या सुटू शकला नाही, हेच पोलीस अधिकाऱ्यांची 'बॉडी लँग्वेज' आज सांगते आहे. या प्रकरणातील संबंधित महिलेने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर पुन्हा नवा पेच उभा राहिला असला तरी त्या महिलेची प्रकृती सुदैवाने धोक्याबाहेर असल्याने पोलिसांचे टेन्शन कमी झाले आहे. मात्र तिघांच्या मदतीने व्हिडीओ तयार करून समोरच्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्याचाच या दांपत्याचा हेतू असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी काल, दि. सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.    
या प्रकरणाचा तपास तांत्रिक मुद्द्यावर आला असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि तोफखाना पोलिसांच्या महत्प्रयासाने अतिशय कमी कालावधीमध्ये या प्रकरणाची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. या दांपत्याने तिघांच्या मदतीने विवस्त्र मारहाणीचा तो व्हिडीओ तयार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दि. मार्च २०२० रोजी एका महिलेने स्वहस्ताक्षरात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अर्जुन साहेबराव वाघ, रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी, तुषार अर्जुन वाघ, रा. सदर, बंडू हिराजी मतकर, रा. सदर, अरुण नमाजी मतकर, रा. सदर, हिराजी त्र्यंबक मतकर, रा. सदर, सुभाष श्रीकृष्ण कराळे, दिलीप दिलीप मछिंद्र नगरे, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, रंगा जाधव आणि इतर दोन अनोळखी इसम यांचा समावेश आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पो. नि. दिलीप पवार यांना फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीतील मजकूर आणि गुन्ह्यातील नमूद करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपीकडे विचारपूस केली असता संशय निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील पीडित महिलेचा पती नारायण नबाजी मतकर याच्याबाबत पोलिसांनी गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळवित असताना नारायण मतकरचे जवळचे मित्र गणेश सोपान झिरपे, रा. एकविरा चौक, पाईपलाईन रोड, अक्षय राजेंद्र कुटे, रा. मढी, ता. पाथर्डी, किरण श्रीधर कुटे, रा. मढी, ता. पाथर्डी यांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, की वाहन चालक असलेल्या नारायण मतकरच्या बायकोने यापूर्वी काही इसमांविरुद्ध बलात्काराची केस दाखल केली होती. ती केस या नारायण मतकरला पैसे घेऊन मिटवायची होती. परंतु समोरचे लोक केस मिटवायचे कमी पैसे देत होते आणि नारायणला त्यांच्याकडून जास्त पैसे हवे होते. त्यासाठी नारायण मतकरने स्वतःला आणि त्याच्या बायकोला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींनी नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला. जेणेकरून गुन्ह्यातील आरोपींना पोलीस तात्काळ अटक करतील आणि अटक आरोपी हे केस मिटविण्यासाठी जास्त पैसे देतील, अशी नारायणची शक्कल होती. त्या अनुषंगाने मित्रांच्या सहाय्याने त्याने कट रचला आणि नारायण हा आमच्या जवळचा मित्र असल्याने त्याच्या सांगण्यावरून आम्ही तिघांनी मिळून नारायणला त्याच्या सांगण्यावरून मदत केली आणि तो आणि त्याची पत्नी याना विवस्त्र करून हातपाय बांधून या दांपत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून मारहाण केल्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियामध्ये तो व्हायरल केल्याची या तिघांनी कबुली दिल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. या गुन्ह्याच्या तपासाअंती नारायण नबाजी मतकर, त्याची पत्नी आणि अन्य आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्याचे पो. नि. हारून मुलानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, यातील फिर्यादी महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला काय, असे विचारले असता पाटील यांनी अद्याप तरी तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
'त्या' गुन्ह्याचे पुढील आकर्षण कायम
सन २०१६ मध्ये जो बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र अद्याप दाखल का झाले नाही, असे विचारले असता पाटील यांनी सांगितले, की त्या अनुषंगाने एक समिती स्थापन करण्यात आली असून सदर समिती याची चौकशी करत आहे. मात्र हे समिती कधी स्थापन झाली, त्या समितीवर कोण कोण आहेत, या समितीने आतापर्यंत काय चौकशी केली, त्या बलात्काराच्या गुन्ह्यात सदर पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी झाली होती का, झाली असल्यास अहवाल कसा आला, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पोलीस यंत्रणेकडे आजमितीला तरी नाही, असे दिसते आहे. त्यामुळे या प्रश्नांसह २०१६ च्या बलात्काराच्या त्या गुन्ह्याचे सर्वांनाच 'पुढी आकर्षण' राहणार आहे.