Breaking News

नागापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री निधी आणणार : भाऊ कोरेगावकर

अहमदनगर/ प्रतिनिधी : “उपनगरातील शिवसेनेच्या दत्ता सप्रे आणि नगरसेवकांनी बोल्हेगाव, नागापूरमधील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिकेतून निधी मिळत नाही आणि त्यामुळे नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यास मोठी अडचण निर्माण होते. याबाबत लवकरच मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन विकासासाठी मुख्यमंत्री विकास निधी उपलब्ध केला जाईल’’, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी केले.
माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांच्या घरी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत नागापूर सोसायटीचे चेअरमन साहेबराव सप्रे यांनी केले. यावेळी नगरसेविका कमळ सप्रे, नगरसेवक अशोक बडे, दत्ता सप्रे, संजय चव्हाण, बाळासाहेब सप्रे, मदन आढाव, नीलेश भाकरे, अक्षय कातोरे उपस्थित होते.
याप्रसंगी दत्ता सप्रे यांनी विकासकामांसाठी येणार्‍या विविध अडचणी मांडल्या. प्रमुख रस्ते, लाईट, पाणी अशा मुख्य नागरी सुविधाच नाहीत. महापालिकेतील आयुक्त, अधिकारी, इंजिनिअर हे जाणूनबुजून या भागातील शिवसेनेच्या नगरसेवकांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या विकासकामात अडथळे निर्माण करतात आणि नागरिकांच्या कामासाठी आंदोलने केली तर आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात, याची आपण गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची तक्रार पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.