Breaking News

अर्थव्यवस्थेला ‘करोना’ची लागण

करोनाचा संसर्ग जगभरातील 100 देशामध्ये पसरला असला, यातून सावरण्यासाठी धैर्याची गरज आहे. आरोग्य संघटना, संशोधक यावर संशोधन करत आहेत. मात्र यावर लगेच काही लस निर्माण होईल, अशी भाबडी आशा ठेवणे देखील चुकीचे आहे. कदाचित लस बाजारात येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशावेळी उपाययोजना आणि खबरदारी घेणे महत्वाचे आहे. करोनाचेेे संकट जगभर घोंघावत असतांना, याचा मोठा फटका अर्थ व्यवस्थेला देखील बसतांना दिसून येत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून शेअर बाजार कोसळतांना दिसून येत आहे. अनेक गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेतांना दिसून येत आहे. अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी याचा धैर्याने सामना करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात करोनाचे संकट वाढत चालले आहे. करोनाचा विषाणू जास्त तापमानात टिकत नाही, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. अशावेळी राज्यात उन्हाळा सुरु झाला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात कमालीची वाढ होतांना दिसून येत आहे. त्यामुळे करोना पुढील काही दिवसांत संपुष्टात येईल, यात शंका नाही. क्रीडा, पर्यटन, रोजगार यासह अनेक क्षेत्राला करोनाचा मोठया प्रमाणात फटका बसत आहे. भारतात करोना विषाणूचा पहिला बळी गेल्याने गुंतवणूकदारांची धास्ती वाढली आहे. करोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम पाहता गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 3400 अंकांनी कोसळला. निफ्टीत 900 अकांहून अधिक घसरण झाली. त्यामुळे शेअर बाजाराचे ट्रेडिंग 45 मिनिटांसाठी रोखण्यात आले. 1987 नंतर प्रथमच बाजारात इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली. यात गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. करोनाने आशियातील सर्वच भांडवली बाजारात कहर केला आहे.
आज थायलँड, दक्षिण कोरिया, फिलिपाइन्स या देशांमधील भांडवली बाजारात निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले. गुरुवारी अमेरिकेतील शेअर निर्देशांक 10 टक्क्यांनी कोसळले होते. त्याचे पडसाद भारतीय बाजारांवर उमटले. आज बाजार उघडताच निफ्टी 966 टक्क्यांनी कोसळला आणि त्याला लोअर सर्किट लागले. तो 8624 अंकांपर्यंत खाली आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3400 अंकांनी कोसळला आणि तो 29 हजार 200 अंकांपर्यंत खाली आला. निर्देशांक 10 टक्क्यांहून जास्त कोसळल्याने त्यात आणखी घसरण होऊ नये म्हणून शेअर बाजाराने 45 मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद ठेवले होते. कोरोना विषाणूच्या साथीमुळे येऊ घातलेल्या मंदीचा दीर्घकालीन परिणाम रोखण्यासाठी युरोपीय देशांकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे. कर सवलती आणि कंपन्यांना वित्तीय पाठबळ देण्यासारख्या उपायांवर विचार केला जात आहे. याशिवाय युरोपीय केंद्रीय बँकेकडूनही काही विशेष उपाय योजले जाणार आहेत. युरोपीय सेंट्रल बँकेच्या अधिकार्‍यांची या संदर्भात एक बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपन्यांना मौद्रिक प्रोत्साहन योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. व्याजदरात कपात आणि कॉर्पोरेट बाँड्सची खरेदी, असे निर्णय जाहीर केले जाऊ शकतात. आरोग्यसेवा, व्यवसाय आणि श्रमबाजार यांना पाठबळ देण्यासाठी 28 अब्ज डॉलरचा गुंतवणूक निधी उभारण्याची योजना ‘युरोपीय आयोगा’ने मंगळवारीच जाहीर केली आहे. ‘युरोपी आयोगा’च्या अध्यक्ष उर्सुला व्होन डेर लियेन यांनी सांगितले की, हा निधी युरोपीय संघाच्या सध्याच्या अर्थसंकल्पामधून घेतला जाईल. हा निधी युरोपीय संघाच्या वार्षिक 20.7 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या अवघा 0.1 टक्का आहे. अशा उपाययोजनांनी कोरोनामुळे होणारे नुकसान मर्यादित राहील.
मौद्रिक प्रोत्साहन योजना आणि सरकारी खर्चातील वाढीमुळे वस्तूंची मागणी वाढेल. दरम्यान, 19 देशांच्या युरोपीय संघाकडे मोठे केंद्रीय कोषागार नाही. ही युरोपीय संघाची मोठी समस्या आहे. करोना व्हायरसने जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारही पोखरायला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरस ज्या वेगाने पसरतोय, त्याच्या दुप्पट वेगाने जगभरातले शेअर बाजार कोसळत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून आर्थिक आणि राजकीय चढाओढ सुरू आहे. दोघांमधल्या ट्रेड वॉरमुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांना काळजीत टाकले होते; पण गेल्या 15 जानेवारीला दोन देशांनी द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर सह्या करून व्यापार युद्ध संपवण्याच्या दिशेने पावले टाकलीत. या कराराने आर्थिक क्षेत्रातल्या अनेकांना दिलासा मिळाला. आता जगाचा जीडीपी वाढेल अशी चिन्हे दिसत असतानाच चीनमधे कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अख्ख्या जगाची आर्थिक घडी पुन्हा एकदा फिस्कटण्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनमधील उद्योग व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याने भारतातील वाहन उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संघटनेने व्यक्त केली आहे. भारतीय वाहन उद्योगासाठी लागणारा 10 टक्के कच्चा माल चीनमधून आयात होत असल्यामुळे ही भीती सियामने व्यक्त केली आहे. चिनी नववर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय वाहन कंपन्यांनी कच्च्या मालाचा नियमित साठा करून ठेवला होता. तथापि, चीनमधील ताज्या ‘लॉकडाउन’मुळे बीएस6 वाहनांसाठी आवश्यक असलेले सुटे भाग उपलब्ध होण्यात अडथळे येऊ शकतात. सुट्या भागांच्या उपलब्धतेअभावी सर्व श्रेणींमधील वाहनांच्या उत्पादनावर परिणाम होईल. प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, तीनचाकी वाहने, दुचाकी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.