Breaking News

डिझेल चोरांचा पाठलाग करताना पोलिस जखमी राहुरी येथील प्रकार


राहुरी/ शहर प्रतिनिधी ः
डिझेल चोरणार्‍यांचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात सहाय्यक पोलिस निरीक्षकाची कार उलटून ते जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेतीनच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावर राहुरीजवळ घडली.
राहुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके सरकारी वाहनाने बुधवारी रात्री गस्त करत होते. त्यांना खबर्‍यामार्फत काही चोरटे ट्रकमधून डिझेल चोरत असल्याची माहिती मिळाली. याचवेळी त्यांना कोल्हारच्या दिशेने एक टाटा नॅनो कार भरधाव जाताना दिसली. शेळके यांनी या कारचा पाठलाग सुरु केला. 
दरम्यान त्यांनी राहुरी शहरात गस्त करणारे हवालदार ढाकणे व पोलिस नाईक जायभाये यांना याबाबत कळवून या कारचा पाठलाग करण्यास सांगितले.
बेलापूर फाटा फिक्स पॉइंटवरील कर्मचारी पोलिस शिपाई लगड व फाटक यांनाही शेळके यांनी नाकाबंदी करण्याबाबत कळविले. परंतु ही नॅनो कार नाकाबंदीस न जुमानता वेगाने कोल्हारच्या दिशेेने पळवण्यात आली. सरकारी वाहनाने या कारचा पाठलाग करण्यात आला. चिंचोली फाटा येथून रस्ता दुभाजक ओलांडून  नॅनो कार राहुरीच्या दिशेने माघारी येत असताना शेळके यांनी हवालदार ढाकणे यांना सतर्कपणे पाठलाग करण्याबाबत कळविले. तेव्हा पोलिस नाईक जायभाय यांनी त्यांच्या खासगी कारमधून बेलापूर फाटा ते राहुरी असा नॅनो कारचा पाठलाग केला. यावेळी नॅनो कारमधील चोरट्यांनी त्यांच्या वाहनातून डिझेल भरलेला 35 लीटर मापाचा ड्रम रस्त्यात फेकला. हे डिझेल रस्त्यावर पडले. यामुळे हॉटेल सर्जासमोर जायभाय यांची कार घसरली. यामुळे कार उलटून एका शेतात जाऊन पडली. यामध्ये पोलिस हवालदार ढाकणे यांच्या नाकाला आणि डोक्याला किरकोळ जखमा झाल्या. त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाचे फ्रॅक्चरही यात झाले. पोलिसांच्या मदतीसाठी चोरट्यांचा मोटारसायकलवर पाठलाग करणारे स्थानिक नागरिकही या डिझेलमुळे घसरुन पडले. त्यांनाही किरकोळ दुखापत झाली. या गडबडीत चोरटे मात्र पसार झाले.