Breaking News

रजनीकांतची पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तामिळनाडूतील राजकारण बदलणार 
चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर महत्वाचे भाष्य केले आहे. गुरुवारी चेन्नई येथे ’ रजनी मक्कल मंदरम’ च्या बैठकीस संबोधित करताना रजनीकांत म्हणाले की, तामिळनाडू राज्यात राजकीय पोकळी निर्माण झाली असून आता जर राजकारणात बदल घडवून आणला नाही तर पुढे कधीच शक्य होणार नाही. मुख्यमंत्री पदाची मला आशा नाही आणि मी त्या ठिकाणी बसण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र युवा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना पक्षात घेऊन नवीन सुरवात करणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी केली. रजनी मक्कल मंदरम’ च्या कार्यक्रमापूर्वी रजनीकांत यांचे हार आणि फुलाची उधळण करून  चाहत्यांनी भव्य स्वागत केले होते. रजनीकांत यांनीसुद्धा हात दाखवत त्यांचे अभिवादन स्वीकारले. आपल्या राज्यात जयललिता आणि करुणानिधी यांच्यासारखे मोठे राजकीय नेते होऊन गेले. लोकांनी त्यांना भरपूर मतं दिले. आता मात्र राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या राज्यात नवीन अभियान सुरु करून बदल घडवून आणायचा आहे. एकीकडे सत्ताधारी अण्णाद्रमुक आहे ज्यांच्याकडे सत्ता आणि ताकद आहे तर दुरीकडे द्रमुक आहे जे पद, पैसा आणि अधिकाराचा वापर करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करीत आहे.  रजनीकांत म्हणाले. सुपरस्टार पुढे म्हणाले, मी 40 वर्ष सिनेमा क्षेत्रात काम करून भरपूर नाव कमविले. याचा फायदा मला राज्याच्या जनतेला करून द्यायचा आहे आपला आगामी पक्ष वेगळा राहणार असून मुख्यमंत्रीपदी उच्च-पदस्थ, अनुभवी आणि युवा असले. प्रशासनात माझा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही. पक्षाला सत्तेत आणण्यासाठी तसेच माध्यम म्हणून मी काम करणार आहे. पक्षाचा प्रमुख म्हणून मी विरोधी पक्षाच्या नेत्यासारखे काम करून सरकारवर लक्ष ठेवील. 2017 डिसेंबर महिन्यात रजनीकांत यांनी आपल्या राजकीय कार्यक्रमाची घोषणा केली परंतु अजून काहीच अधिकृत जाहीर झालेले नाही. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभा निवडणूका आहेत. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले होते तर दिल्ली हिंसाचारवरून केंद्रीय गृह मंत्रालय आणि गुप्तचर विभागावर टीकास्त्र सोडले होते. तामिळ विचारक पेरियार यांच्यावर केलेलं भाष्यामुळे रजनीकांत यांच्यावर चहू बाजूंनी टीका झाली होती. रजनीकांत यांचे मित्र आणि अभिनेते कमल हसन सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत मक्कळ निधी मैयामच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहेत.

चौकट . . . .
चुक झाल्यास कारवाई
आमचा पक्ष स्वत: सरकारला प्रश्‍न विचारेल. कोणतीही चुक झाल्यास संबंधितांविरोधात पक्ष कारवाई करेल. आमच्याशी जोडल्या गेलेल्या सदस्यांचा आम्ही योग्यरित्या वापर करू. आम्ही जे काही ठरवलं आहे, ते आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. आम्ही नेते, पत्रकार आणि अधिकार्‍यांशीही त्याबाबत चर्चा केली. परंतु त्यासाठी कोणीही तयार झालं नाही. परंतु आम्ही जे काही ठरवलंय त्यावरच आम्ही पुढे जाऊ, असंही त्यांनी नमूद केलं आहे.