Breaking News

नियोजन मंडळाच्या निधीतून व्हेंटीलेटर घेण्यास मान्यता : पालकमंत्री


अहमदनगर / प्रतिनिधी :
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली.  आरोग्य सुविधांसाठी आणि खासकरुन व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून करण्यास मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडता कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडावी. कोणत्याही परिस्थितीत हे संकट आणखी वाढणार नाही, याची काळजी प्रत्येक जिल्हावासियांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट सुरु झाल्यापासून यासंदर्भात दैनंदिन आपण जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या संपर्कात आहोत. कोरोनाचे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा रुग्णालयास तसेच आरोग्य यंत्रणेस तात्काळ व्हेंटीलेटरची आवश्यकता लक्षात घेऊन ते नियोजन मंडळाच्या निधीतून खर्च करण्यास मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली.
 राज्य आणि केंद्र शासनाने अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ही परिस्थिती हाताळण्यासाठी अनेक आवश्यक पावले उचलली आहेत. जिल्हा स्तरावरही त्यादृष्टीने कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जी पावले टाकत आहेत, त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. जिल्हावासियांनी सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार  टाळावा, यात आपण यशस्वी ठरलो, तर मोठ्या संकटावर मात करु शकू, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला. संकटाचे गांभीर्य ओळखा, विनाकारण घराबाहेर पडू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, संकटाला दूर ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.