Breaking News

भारताचे पाच बॉक्सर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र


अम्मान (जॉर्डन): भारताचे पूजा रानी, विकास कृष्णन, लव्हलिना बोर्गोहेन, आशिशकुमार आणि सतीश कुमार हे पाच बॉक्सर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. या सर्वांनी रविवारी आशियाई बॉक्सिंग पात्रता स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेतून 5 भारतीय बॉक्सरांनी इतिहास रचत ऑलिंपिकसाठी पात्रता फेरीच्या स्पर्धेत आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश करीत टोकियोचे तिकीट मिळविले आहे. एकाच वेळी ऑलिंपिकसाठी 5 भारतीय बॉक्सर पात्र होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लव्हलिना व पूजा या प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत तर विकास कृष्णन सलग तिसर्‍या ऑलिम्पिकमध्ये खेळेल. आशिशकुमार हा 75 किलोगटात तर सतीश कुमार 91किलोवरील गटात पात्र ठरला आहे. लव्हलिना हिने 69 किलोगटाच्या उपांत्यपूर्व लढतित उझबेकी बॉक्सरवर विजय मिळवला. पूजा रानीने 75 किलोगटाच्या लढतीत थायलंडच्या पोर्निप्पाला मात देत उपांत्य फेरी गाठली. 29 वर्षीय,पूजारानीने गेल्यावर्षी आशियाई स्पर्धेत 81 किलोगटात सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी तीला बरेच वजन कमी करावे लागले.ती 75 किलोगटात खेळत आहे. प्रत्येक वजन गटातील पहिले पाच बॉक्सर टोकियोसाठी पात्र ठरणार आहेत. यादृष्टीने 81 किलोगटात सचिन कुमारचा मार्ग मात्र खडतर झाला आहे. तो उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आणि त्याला पहिल्या पाचात स्थान मिळवण्यासाठी आता आणखी दोन लढती जिंकाव्या लागणार आहेत.