Breaking News

पोलिसांनाही हवी आहे मनःशांती!

काल परवा नाशिकच्या पोलीस अधिक्षक डा.आरती सिंह यांचा नृत्य करणारा  एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.याच व्हिडीओने काही महिन्यांपुर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील आपल्या सवंगड्यांसोबत बाला डान्स करीत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची आठवण अनेकांना करून दिली.खरेतर अशा पध्दतीचे व्हिडीओ सोशल करून अघोरी आनंद मिळवण्यात व्यस्त असलेल्या प्रवृत्ती स्वतः अनसोशल असल्याचे सिध्द करतात.पोलीस म्हणजे कुणी पृथ्वीवर प्रगट झालेले अवतार किंवा एलीयन्स आहेत असा या मंडळीचा समज नेहमी असतो. पोलीसांना आपल्यासारखे मन नाहीच,मग भावनांचा प्रश्‍न कुठे उरतो? त्यांना कुटूंबही नाही.
 सतत तणावाखाली राहून तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी झटणार्‍या या खाकी वर्दीच्या आत झाकलेल्या हाडामासांच्या गोळ्याला मनःशांती मिळूच नये का? मग मनःशांती मिळवण्यासाठी असे छोटेछोटे विरंगूळ्याचे क्षण जे तुमच्या आमच्या सुरक्षेला जराही धक्का न लावता शोधले जात असतील तर आपल्या असुरी आनंदाला उकळी का फुटावी?
पोलीस नावाचा माणूस आपण ज्या नजरेने पहातो तसा आपल्याला तो दिसतो.आपल्याकडे पोलीसांना पारखणारी नजर मुळातच दुषीत झाली आहे.पोलीस म्हणजे अवैध धंद्यांवर जाऊन हप्ते खाणारा,फिर्यादी आणि संशयीतांकडून लाच घेणारा भ्रष्ट ,अशी समाजात प्रतिमा निर्माण केली गेली आहे.अर्थात ही परिस्थिती अगदीच नाकारावी अशी नसली तरी त्याची दुसारी बाजू मुद्दामहून आपण झाकून ठेवतो. काही प्रमाणात पोलीसांत भ्रष्ट प्रवृत्ती बोकाळल्या आहेत.हे मान्य करीत असतांना या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत हे मान्य करण्याची दानत आपण दाखवली पाहीजे.लाच देणारा आणि घेणारा कायद्याच्या नजरेत सारखाच दोषी असतो. पोलीस लाच घेत असेल तर ती आपण देतो म्हणून.  मग भ्रष्ट पोलीस की आपण?
असो!  खरा मुद्दा वेगळा आहे.अंतर्गत सुरक्षेसाठी अस्तित्वात आलेल्या पोलीस नावाच्या यंञणेत काम करणारा आपल्यासारखाच हाडामासांचा सजीव गोळा आहे.याचे भान समाजाला राहीले नाही.कुठलीही आणिबाणीची परिस्थिती उद्भवली की आपण सर्वात आधी पोलीसांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवतो.महापुर येवो,भुकंप होवो,नाहीतर दंगल, सर्वात आधी येतो तो पोलीस.राजकीय सामाजिक सभासंमेलन ,आंदोलनं मोर्चे, पोलीसांचा बंदोबस्त हवाच. जेंव्हा आपण बायका पोरांसोबत सणउत्सवांचा , धार्मिक सोहळ्यांचा आस्वाद चाखत असतो तेंव्हा हाच पोलीस आपले  आईवडील, बायका पोरांचा त्याग करून आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा असतो.आपल्या आनंदात तो त्याचे कुटूंब शोधत असतो.
एव्हढेच कशाला व्हीआयपी बंदोबस्त तर पोलीसाच्या पाचविलाच पुजलेला.माणसासोबत निसर्गही पोलीसांच्या बाबतीत क्रूर बनल्याने साथीच्या रोगराईतही जसे आता कोरोनाच्या बंदोबस्ताचे कर्तव्य पोलीस सातत्याने बजावतांना दिसतात.म्हणजेच जरा कुठे खट्ट वाजले की पोलीसाची आठवण आपल्याला होते.व्हिआयपीच्या उपस्थितीत होणारा एखादा शुभ सोहळा असो की खासगी कार्यक्रम,मोर्चा असो की जाहीरसभा,सण उत्सव. घटना ,ि नमित्त कुठलेही असो आपल्याला तिथं पोलीस हवाच हवा.अगदी एखाद्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली तरी पोलीसांशिवाय मार्ग निघत नाही.पोलीसांना लाखोल्या वाहून आपण जबाबदारीपासून पळ काढतो.सरकारी भांडण असो नाही तर खासगी वाद, पोलीसांची उपस्थिती आपल्या समाजव्यवस्थेने अपरिहार्य ठरवली आहे.
पोलीसांनी कुठले काम करायचे आणि कुठले नाकारायचे याची मार्गदर्शक संहिता असेलही, पण ती वापरण्याची मुभा माञ नाही. बेवारस प्रेत सांभाळण्यापासून विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने  वर्षानुवर्ष सांभाळण्याची जबाबदारी  व्यवस्था नावाच्या राक्षसाने पोलीसांवर ढकलली आहे. खाकी वर्दी अंगावर चढवून कर्तव्यासाठी घराबाहेर पडलेला पोलीस आपल्या बायकांपोरांमध्ये पुन्हा कधी मिसळेल याची शाश्‍वती कुणीच देत नाही.
थोडक्यात कर्तव्याचे तास निश्‍चित नाहीत.समाजाची जबाबदारी आणि त्यातून सांघिक दडपण आणि वरिष्ठांचा धाक अशा दुहेरी तिहेरी ओझ्याखाली वावरणारा समाजरक्षक पोलीसच खर्‍या अर्थाने सर्वाधिक असुरक्षीत आहे. एखाद्या प्रकरणात पोलीसाने कारवाई केली तर का केली आणि केली नाही तर का केली नाही. अशा दोन्ही बाजूने तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत असलेला पोलीस समाजाच्या दृष्टीने एकदम स्वस्त झाला आहे. पोलीसाचा पुर्वीसारखा धाक वाटत नाही.कुणीही उठतो खाकीवर टपली मारून जातो.इतके सारे सोसूनही शासन पातळीवरही पोलीसांविषयी उदासीनता पहायला मिळते.संघटन तर कायद्यानेच प्रतिबंधित,म्हणजे न्यायाची दाद मागणारे मुसळही केरात रूतले.
पोलीसांच्या तुलनेत अन्य विभागात काम करणारे शासकीय नोकर उदा.शिक्षक,आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्या इतकाच जवळपास पगार घेणारा पोलीस,कामाचा ताण माञ कितीतरी अधिक पटीने झेलतो.अशा असंतुलीत वातावरणात वावरणारा हा घटक मानसिक आणि शारिरिक दृष्ट्या सुदृढ कसा राहील? एका सर्वेक्षणानुसार निवृत्तीनंतर 20 टक्के पोलीसांचे आयुष्यमान 70-75 तर 8 टक्के पोलीसांचे आयुष्यमान 58-62 वर्ष इतके आहे. या आकडेवारी नुसार पोलीस खात्यात नोकरी करताना येणारा  ताण आणि त्यातून होणारी मानसिक शारिरीक हानी किती गंभीर आहे याची कल्पना येते. म्हणूनच आपण पोलीसांविषयी शक्य तितका सकारात्मक विचार करण्याची सवय अंगी बाळगायला हवी..टिका तर नेहमीच करतो.आम्हीही या टिका करण्याच्या स्पर्धेत नेहमीच पुढे असतो.माञ दुसरी बाजुही मांडण्याचे धाडस करायला हवे.
आणखी एक बाब या ठिकाणी नमुद करणे क्रमप्राप्त आहे. पुर्वी चौथी आणि आता 12 वी फारफार तर पारंपारीक पदवी इतके शिक्षण झालेला पोलीस एखाद्या गुन्ह्याचे दोषारोप पञ तयार करतो, पंचनामा लिहीतो. याच दस्ताच्या आधारावर कनिष्ठ न्यायालय, जिल्हा न्यायालय , उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात उच्च विद्याविभूषीत विद्वान पंडीत कायद्याचा किस काढतात. म्हणजेच इतके मोठे जबाबदारीचे काम अचुक करणारा पोलीस नावाचा माणूस एवढ्या तणावाखाली काम करीत असेल तर त्याची मनःशांती संतुलीत कशी राहील याची जबाबदारी समाज म्हणून आपण स्वीकारायला नको का?