Breaking News

राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये ’रस्सीखेच’ नवी दिल्ली : राज्यसभेच्या आगामी निवडणूकीसाठी एका जागेवरुन

महाविकासआघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यामुळे आता मतभेद समोर येत आहेत. महाविकासआघाडीच्या वाट्याला राज्यसभेच्या 4 जागा आल्या असून त्यापैकी आघाडीतील तीन पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. उर्वरित चौथ्या जागेबाबत महाविकासाआघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. महाविकास आघाडीतील तीन पक्षांची प्रत्येकी 1 जागा येणार असली तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाध्यक्ष शरद पवार आणि फौजिया खान अशी दोन नावे निश्‍चित केली आहेत. यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा जाणार असतील, तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा देण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे बाळासाहेब थोरात त्यांनी स्पष्ट केले आहे. फौजिया खान यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच आपल्याला सांगितल्याची माहिती थोरात यांनी दिली. फौजिया खान यांच्या उमेदवारीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत चौथा उमेदवार महाविकासआघाडीची समन्वय समिती चर्चा करुन ठरवेल असे थोरात म्हणाले. काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली असली तरी त्यावरुनही चुरस असल्याचे दिसते आहे. रेसमध्ये रजनी पाटील, राजीव सातव आणि मुकूल वासनिक यांची नावे आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल यावर स्पष्टीकरण आलेले नाही. याबाबतचा निर्णय सोनिया गांधी बुधवारी घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्याशी दिल्लीत निवास्थानी भेट घेऊन चर्चा केली. थोरात म्हणाले की, देशाच्या पातळीवरील निवडणूक असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची हा सोनिया गांधी यांचा अधिकार असून त्याच निर्णय घेतील.