Breaking News

करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यास सर्वोच्च प्राधान्य ः मुख्यमंत्री सर्व शाळा, महाविद्यालये बंद, परीक्षाही पुढे ढकलण्याच्या सूचना


 मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले.
महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.


 
निवडणूका तीन महिने पुढे ढकलल्या
ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहे. करोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीचा निधीचा पहिला हप्ता म्हणून 45 कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून, ज्या प्रवाशांना घरी राहून क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहे , त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासर्व कारवाई करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  करोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे.