Breaking News

कडीत खुदर्र्मध्ये बिबट्या अडकला पिंजर्‍यात महिनाभरापासून घुटमळत होता पिंजर्‍याभोवती


बेलापूर/प्रतिनिधी ः
श्रीरामपूर तालुक्यातील कडीत खुर्द येथे लावलेल्या पिंजर्‍यात शनिवारी सकाळी सहा वाजता बिबट्या जेरबंद झाला.
कडीत खुर्द येथे मच्छिंद्र वडीतके यांच्या वस्तीवर गट नं 224 मध्ये बिबट्याला अडकवण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. शनिवारी सकाळी त्यात बिबट्या अडकला. बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा बळी गेल्यामुळे परिसरातील नागरिक सतत भीतीच्या सावटाखाली वावरत होते. शेतकरी यामुळे शेतात जाण्यास धजावत नव्हते. वन अधिकारीदेखील परिसरात तळ ठोकून होते. परिसरात अनेक ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावले होते. या ठिकाणी असणार्‍या पिंजर्‍याभोवती गेल्या महिनाभरापासून हा बिबट्या घुटमळत होता.
पिंजर्‍यात भक्ष्य टाकूनही बिबट्या पिंजर्‍यात शिरत नव्हता. वनरक्षक गोसावी यांनी ट्रॅप कॅमेर्‍याद्वारे या बिबट्यावर लक्ष ठेवले होते.
परंतु बिबट्या पिंजर्‍यात अडकत नसल्याने पिंजर्‍यात मासे, कोंबडीचे मांस  ठेवण्यात आले. शनिवारी सकाळी अखेर बिबट्या भक्ष्यासाठी पिंजर्‍यात शिरला.
 याकामी वनपरीक्षेत्र वनरक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोसावी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांना वनरक्षक एम. एस. इंगळे, वनरक्षक विक्रांत बुरांडे, वनरक्षक सुधाकर घोडके, वनमजूर बी. जी. खराडे, घोडके, आर. पी. शेळके, वाहनचालक संजय पंढरे, गणेश शिंदे यांनी मदत केली. गळनिंब, कुरणपूर येथे बालकांवर बिबट्याने हल्ला केला होता. तेव्हापासून या भागातील नागरिकांमध्ये बिबट्याबाबत धसका होता. शेतकरी शेतात जाण्यासही घाबरत होते.