Breaking News

सरकारचे वाभाडे काढण्यासाठी मनसेचे ‘शॅडो कॅबिनेट’ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची घोषणा


नवी मुंबई ः महाराष्ट्रातील विविध समाजगटासाठी एक वेगळा प्रयोग म्हणून मनसेने प्रतिरुप मंत्रिमंडळाची (शॅडो कॅबिनेट) स्थापना करण्यात आली आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट आहे. पण प्रत्येकवेळी वाभाडेच काढले पाहिजेत असे नाही. तर त्यांनी चांगले काम केले तर त्यांचे कौतुकही करायचे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्रातील विविध प्रश्‍नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू. मात्र जिथे चुका होतील, तिथे वाभाडे देखील काढू असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 14 वर्ष झाली, प्रवास सुरु आहे. यात माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीका केली पण हे चालायचंच. इतक्या चढ उतारानंतर देखील तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात याचा मला आनंद झाला आहे. काँग्रेसची केंद्रात सत्ता होती. आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? गेल्या 14 वर्षांत आपण अनेक कामं केली. तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही. लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. पण मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ आहे? प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात, पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला या कामात सहभागी करून घेईन. मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर केलं आहे. यावेळी अमित ठाकरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पर्यटन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्या कारभारावर लक्ष्य कसे ठेवतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.