Breaking News

मध्यप्रदेशातील टोकाचा सत्ता संघर्ष


 भाजपने पुन्हा एकदा मध्यप्रदेशात कमळ फुलवण्याची तयारी केली आहे. अलीकडच्या वर्षभरातील भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरल्यानंतर मध्यप्रदेशातील भाजपचे ऑपरेशन फेल होते, का असे वाटत असतांनाच भाजपच्या गळाला काँगे्रसचे दिग्गज नेते ज्योतीरादित्य सिधिंया लागल्यामुळे काँगे्रस बॅकफूटवर जातांना दिसून येत आहे. मात्र राज्यात भाजप येऊ द्यायचे नाही, असा चंग काँगे्रसने केल्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथसह, सर्व आमदार आपल्या आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास, मध्यप्रदेशात पुन्हा विधानसभेच्या निवडणूका होतील. यातून काँगे्रस सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. 
 मात्र पक्षीय राजकारणांत सहानुभूतीला किंमत नसते. तसेच सहानुभूतीच्या जोरावर दीर्घकाळ राजकारण करता येत नाही, याचा धडा अजूनही काँगे्रसने घेतलेला दिसत नाही. काँग्रेस अजूनही कात टाकतांना दिसून येत नाही. काँगे्रस गलितगात्र झाल्याचे दिसून येत आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या देान्ही राज्यात काँगे्रसची सत्ता येण्यासाठी तरुण पिढीने घेतलेली मेहनत विसरता येणार नाही. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिधिंया असो की राजस्थानात राजेश पायलट. या युवा नेतृत्वांनी कमाल करत, आपल्या पक्षाला सत्ता आणून दिली. मात्र सत्ता आल्यानंतर त्यांना डावलण्यात आले. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जनतेची कामे करण्यासाठी सत्ता हवी असते. निर्णय प्रक्रिया राबवावी लागते. मात्र निर्णय घेण्याचे, आणि ती अंमलबजावणी करण्याचे स्वातंत्र्य नसेल, तर पक्षात राहण्यात काय अर्थ आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ आणि दिग्विजय सिंह या दोन नेत्यांनी ज्योतिरादित्य सिधिंया यांना डावलण्याचे काम केले. परिणामी, सिधिंया यांना भाजपची जवळीक साधण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र काँगे्रस सिधिंया यांचे बंड शांत करु शकत होती. त्यांची समजुत काढू शकत होते. मात्र काँगे्रसने या बाबी टाळल्यामुळे सिधिंया भाजपवासी झाले.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि भाजपा यांच्यात ’डील’ करणारा कोण आहे ? कोण आहे ज्याने सिंधिया यांना 18 वर्षांची काँग्रेसची साथ सोडण्यास भाग पाडले ? आणि ज्याच्या मदतीने आता सिंधिया भाजप पक्षात प्रवेश करणार आहे ? माहितीनुसार, यासर्वांमागे भाजपा प्रवक्ता जफर इस्लाम यांचा हात असल्याचे समजते. सिंधिया यांना काँग्रेसपासून दूर भाजपच्या छावणीत आणण्यात जफरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सिंधियाच्या दिल्लीतील घरातही जफर यांनी भेट घेतली होती. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून जफर आणि सिंधिया यांच्यातील बैठका वाढल्या होत्या. येथूनच भाजपने खेळाची सुरुवात केल्याचं म्हंटले जात आहे. सिंधिया आणि जफर यांची नुकतीच पाच वेळा भेट झाली असल्याचे समजते. जफर यांनी प्रत्येक बैठकीची मिनिटे भाजप हाय कमांडशीही शेअर केली. सभेच्या निकालाचा सखोल अभ्यास केल्यावरच मध्य प्रदेशात भाजपने ’ऑपरेशन लोटस’ सुरू केले होते. या संपूर्ण कारवाईत भाजपकडून फक्त लॉजिस्टिक व अन्य मदत पुरविली गेली. संपूर्ण ऑपरेशन ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. एवढेच नव्हे तर सोमवारी आणि मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बैठकीतही जफर 7 लोककल्याण मार्गावर उपस्थित होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या 22 आमदारांनीही राजीनामा दिला. ज्यामुळे कमलनाथ यांचे सरकार धोक्यात आले आहे. सिंधियांच्या या निर्णयाने मध्य प्रदेशचे कमलनाथ यांच्या नेतृत्वात असलेले काँग्रेसचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. मात्र, काळजी करण्याची काहीच नाही असे कमलनाथ अजूनही सांगत आहेत. सरकार फ्लोर टेस्ट पास करेल. ज्योतिरादित्य सिधिंया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँगे्रसवर जोरदार टीका केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, वास्तव न स्वीकारणे आणि नवीन नेतृत्त्वाला संधी न देणे हेच काम सध्याच्या काँग्रेस नेतृत्त्वाकडून केले जात आहे. या वातावरणात त्या पक्षात राहणे माझ्यासाठी अशक्य होते. मध्य प्रदेशात 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर आपली स्वप्ने पूर्ण होतील असे मला वाटले होते. पण 18 महिन्यांतच स्वप्नांचा चक्काचूर झाला. मध्य प्रदेशमधील शेतकर्‍यांना अजून संपूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही. राज्यात तरुणांना रोजगार मिळत नाही. पण भ्रष्टाचाराचा उद्योग एकदम तेजीत सुरू आहे. वाळू उपशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. काँगे्रसकडून सिधिंया यांना अनेक पदे अठरा वर्षांत दिल्याच्या वल्गना करण्यात आल्या असल्या तरी, काँगे्रसला नवसंजीवनी देण्याचे कोणतेही काम काँगे्रसने केलेल नाही. काँगे्रस गलितगात्र होत असतांना काँगे्रसमध्ये महत्वाचे फेरबदल करण्याची गरज होती. राहुल गांधी यांच्या धरसोड वृत्तीमुळे देशाच्या राजकारणांत त्यांची विरोधकांची भूमिका तितकीशी मजबूत नव्हती. देशात भाजपविराधी राजकारण तयार होत असतांना, काँगे्रसने भाजपला जोरदार विरोध करावा, असा एक मतप्रवाह असतांना काँगे्रस नेहमीच आपल्या नेत्यांच्या ईडी, सीबीआय या संस्थापासून बचाव करण्यासाठी भाजपवर थेट हल्ला करण्यात कचरत होती. यामुळे काँगे्रसमधील अनेक नेते नाराज आहेत. काँगे्रसची धूरा गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त दुसर्‍या व्यक्तीकडे देण्याची मागणी होतांना दिसून येत आहे. काँगे्रसला पुर्नजीवित करण्याचे आव्हान समोर असतांना, राहुल गांधी सातत्याने समोर येतांना दिसून येत नाही. मध्यप्रदेशमध्ये इतक्या मोठया प्रमाणावर राजकीय नाटय घडत असतांना, राहुल गांधी सर्व घडून गेल्यानंतर समोर येतांना दिसून येत आहे. काँगे्रसच्या या धरसोड वृत्तीची किंमत त्यांना मोजावी लागू शकते.