Breaking News

तीन महिन्यांचे धान्य एकदाच द्यावे देविदास देसाई यांची मागणी


टिळकनगर/ प्रतिनिधी ः
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कार्डधारकांना तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.
  पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात देसाई यांनी म्हटले आहे की,  कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना सुरु केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी एकत्र न येण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे. शासनाने कार्डधारकांना वितरीत करावयाचा धान्याचा कोटा एकाच वेळेस तीन महिन्यांचे धान्य दिल्यास कार्डधारकांची दुकानात गर्दी होणार नाही.
तसेच दुकानदार टप्प्याटप्प्याने दुकानावर गर्दी होऊ न देता वितरण करतील. कारण धान्य दुकानात धान्य आल्यास कार्डधारक एकाच वेळेस गर्दी करतात. एकाच वेळेस तीन महीन्याचे धान्य दिल्यावर दुकानावर जास्त गर्दी होणार नाही. शासनाने या मागणीचा विचार करावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर देविदास देसाई,  रज्जाक पठाण, मीना कळकुंबे, विश्‍वास जाधव, बाळासाहेब दिघे, कैलास बोरावके,  ज्ञानेश्‍वर  वहाडणे,  सुरेश उभेदळ, बाळासाहेब देवखीळे,  सुरेश कोकाटे,  रावसाहेब भगत,  बाबा कराड,  भाऊसाहेब वाघमारे,  बजरंग दरंदले,  माणिक जाधव,  बाबासाहेब ढाकणे,  मुकुंद सोनटक्के यांच्या सह्या आहेत.