Breaking News

काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही ः ज्योतिरादित्य शिंदेंची टीका

नवी दिल्ली ः पूर्वीचा काँग्रेस पक्ष आता राहिलेला नाही. लोकसेवेचे काम या पक्षाकडून केले जात नाही, या शब्दांत ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते 13 मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेस असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारीच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. बुधवारी दुपारी त्यांनी औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, खासदार आणि मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, वास्तव न स्वीकारणे आणि नवीन नेतृत्त्वाला संधी न देणे हेच काम सध्याच्या काँग्रेस नेतृत्त्वाकडून केले जात आहे. या वातावरणात त्या पक्षात राहणे माझ्यासाठी अशक्य होते. मध्य प्रदेशात 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर आपली स्वप्ने पूर्ण होतील असे मला वाटले होते. पण 18 महिन्यांतच स्वप्नांचा चक्काचूर झाला. मध्य प्रदेशमधील शेतकर्‍यांना अजून संपूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही. राज्यात तरुणांना रोजगार मिळत नाही. पण भ्रष्टाचाराचा उद्योग एकदम तेजीत सुरू आहे. वाळू उपशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. भाजप लोकशाही मानणारा पक्ष आहे. प्रत्येकाचे म्हणणे आमच्या पक्षात ऐकले जाते. भारताला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली सुरू आहे. त्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांचे मी पक्षात स्वागत करतो, असे जे पी नड्डा यावेळी म्हणाले.  ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे 26 व्या वर्षी खासदार झाले होते. ते देखील जनसंघातच होते. परंतु, सन 1977 मध्ये आणीबाणीनंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. 1980 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि ते थेट केंद्रीय मंत्री बनले. 2001 मध्ये विमान अपघातात त्यांचे निधन झाले.चौकट . . . .
मध्य प्रदेशचा व्हायरस’ महाराष्ट्रात घुसणार नाही
महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवला जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी मात्र निश्‍चिंतता व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची ’पॉवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन 100 दिवसांपूर्वी फसले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी, असे ट्विट त्यांनी केले आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. मध्य प्रदेशनंतर हाच फॉर्म्युला भाजप महाराष्ट्रात राबवला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.


चौकट . . ..
ज्योतिरादित्यांना जनता धडा शिकवेल : अशोक गेहलोत
मध्यप्रदेशचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपचे सद्स्यत्व स्वीकारले. मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. शिंदे यांच्या राजीनाम्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा लोकांनी यापूर्वीच पक्ष सोडायला हवा होता, असे म्हटले आहे. त्यांनी ज्योतिरादित्य यांना संधीसाधू म्हटले. काँग्रेसने गेल्या 18 वर्षांत त्यांना भरपूर दिले. त्यांनी ऐनवेळी संधीसाधूपणा दाखवला आहे. जनता त्यांना योग्य धडा शिकवेल, असा टोलाही त्यांनी लगावला. जयपूर विमानतळावर ते बोलत होते. गेहलोत पुढे म्हणाले की, लोकशाहीची कशी हत्या होत आहे. हे पाहता येईल. मध्य प्रदेशचे आमदार जयपूरला येत आहेत. ते कशा पद्धतीने पैशांचा खेळ करत आहेत. सत्तेत बसलेले लोक नंगा-नाच करत आहेत. असे कधीच पाहिले नव्हते. तरीही काँग्रेस मजबूत आहे, असा दावा त्यांनी केला.