Breaking News

भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ फसले !

भाजपने देशभरात विविध राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी राबवले आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षांत भाजपचे ऑपरेशन लोटस अपयशी होतांना दिसून येत आहे. याचे कारण भाजपने शोधण्याची गरज आहे. महाराष्ट्रात भाजपचे ऑपरेशन लोटस फसले, त्यानंतर मध्यप्रदेशात देखील भाजपचे ऑपरेशन लोटस पूर्णपणे फसल्याचे दिसून आले. मध्यप्रदेश राज्याच्या कोट्यातून राज्यसभेच्या तीन जागांच्या गदारोळ सुरू आहे. सध्या विधानसभेत 228 सदस्य आहेत. दोन आमदारांच्या निधनानंतर दोन जागा रिक्त आहेत. सध्या काँग्रेसकडे 114, भाजपकडे 107 आमदार आहेत. उर्वरित नऊ जागांपैकी दोन जागा बसपाकडे आहेत तर सपाचे एक आमदार आहेत. त्याचवेळी विधानसभेत चार अपक्ष आमदार असून भाजपचे लक्ष काँग्रेसच्या नाराज आमदारांवर आहे. हेच कारण आहे की, मंत्रीपदाची जागा न मिळाल्याबद्दल रागावलेल्या आदिवासी आमदार बिसाहुलाल यांच्यासह अन्य आमदारांवर भाजपची नजर आहे, परंतु काँग्रेसचे आमदार साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने यापूर्वी देखील कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले आणि मोठ्या घडामोडींनंतर सत्ता स्थापन केली. कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण काँग्रेस आणि जेडीएसने सरकार स्थापन केले. नाराज असलेल्या 17 आमदारांना भाजपने हाताशी धरले आणि सूत्र हलवली. कर्नाटकच्या या बंडखोर आमदारांना मुंबईतील रेनिसन्स (जिथे सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत) हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आणि काँग्रेस-जेडीएस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास भाग पाडले. 17 आमदार गैरहजर असल्यामुळे बहुमताचा आकडा खाली आला आणि भाजपने सहज सत्ता मिळवली.
मात्र कर्नाटक मधील ऑपरेशन लोटसनंतर भाजपचे सर्व आपॅरेशन लोटस अयशस्वी ठरल्याचे दिसून येतात. एक ते दीड वर्षांपूर्वी भाजपने आखलेले सगळे नियोजन असो की, ऑपरेशन लोटस असो, ते यशस्वी व्हायचे. या ऑपरेशन मागे भाजपचे तत्कालीन पक्षाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रणनिती असायची असे बोलले जात असे. मात्र एका वर्षभरात भाजपचे सगळेच ऑपरेशन फसले, आणि भाजपची पुरती नाचक्की झाल्याचे दिसून आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, आज जनाधार भाजपच्या विरोधात जातांना दिसून येत आहे. लोकसभेच्या दुसर्‍या टर्ममध्ये मोदी सरकारला घवघवीत यश मिळाले. एकहाती भाजपची केंद्रात सत्ता आली आहे. मात्र विविध राज्य भाजपच्या हातातून जातांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात भाजपच विरोधी पक्ष असेल, असे कोणतेही चित्र नव्हते. मात्र भाजपने जेव्हा एकहाती सत्ता राबविण्याचा पवित्रा घेतला, तेव्हाच भाजप सत्तेबाहेर जाऊ शकतो, हे शिवसनेने ताडले होते. शिवसेनेला राष्ट्रवादी काँगे्रस पाठिंबा देईल, ही अपेक्षा होती. मात्र विचारधारा भिन्न असलेली काँगे्रस पाठिंबा देईल का, हा प्रश्‍न शिवसेनेसमोर होता. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांनी या बाबी जुळवून आणल्या आणि, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तास्थापन झाले. मात्र महाविकास आघाडीचे सत्तास्थापन होण्यापूर्वी भाजपने राज्यात ऑपरेशन लोटस राबविले होते. अजितदादा पवार यांना सोबत घेऊन भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र ही शपथ औटघटकेची ठरली होती. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशमध्ये देखील भाजपने काँगे्रससह मित्रपक्षांचे दहा आमदार पळवून लावत, सत्तास्थापनेचा खेळ रचला होता. मध्य प्रदेशात भाजपचं ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले आहे.
त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीआधीच काँग्रेस सरकार पाडण्याची योजना फसली आहे. कमलनाथ सरकारवर नाराज असलेले सहा आमदार माघारी परतले आहेत. तर 4 आमदार अजूनही बेपत्ता आहेत. राज्यातलं सरकार सुरक्षित असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजपाचे ऑपरेशन लोटस एका आमदाराच्या गनमॅनमुळे फसले आहे. सर्व काही योजनेनुसार सुरू असताना गनमॅननं केलेल्या एका फोनमुळे ऑपरेशन लोटस अपयशी ठरले. काँग्रेस आघाडीतल्या काही नाराज आमदारांना मंगळवारी रात्री चार्टर्ड विमानाने दिल्लीला नेण्यात आले. आमदार दिल्लीला रवाना होत असताना एका गनमॅनने फोन केला. याच कॉलमुळे आमदार दिल्लीत एकत्र थांबणार असल्याची माहिती फुटली. त्यामुळे काँग्रेसला बराच अवधी मिळाला. यानंतर काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह तातडीने दिल्लीला रवाना झाले. राज्य सरकारला पाठिंबा देणारे काँग्रेस आघाडीतले 12 आमदार मंगळवारी दिल्लीत पोहोचणे अपेक्षित होते. यापैकी 10 आमदार दिल्लीत पोहोचलेदेखील होते. काँग्रेस आघाडीतले आमदार बुधवारी भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार होते. 10 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांचे सरकार कोसळेल, अशी योजना होती. दिल्लीत दोन, तर बंगळुरुत एका ठिकाणी या आमदारांना थांबवण्यात येणार होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्याकडे आमदारांच्या बंगळुरू मुक्कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा सुगावा लागताच काँग्रेसने त्यांच्या 114 आमदारांना व्हिप बजावला. कोणत्याही आमदाराने पक्षाचा व्हिप अमान्य केल्यास त्याचे विधानसभेतले सदस्यत्व रद्द होईल, असे संसदीय कार्यमंत्री गोविंद सिंह यांनी व्हिप जारी करताना म्हटले होते. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास त्याची किंमत संबंधित आमदाराला चुकवावी लागेल, असा इशाराच सिंह यांनी दिला होता. त्यानंतर मात्र काँगे्रसचे आमदार स्वगृही परतल्यामुळे भाजपचे पुन्हा एक ऑपरेशन लोटस अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.