Breaking News

जनगणना कार्यक्रमास सर्वांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी

अहमदनगर/ प्रतिनिधी : “राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी यात सहभागी असणार्‍या सर्व यंत्रणांनी त्यांची जबाबदारी अचूकपणे आणि पुरेशा संवेदनशीलतेने पार पाडावी’’, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. नागरिकांनीही या जनगणनेसाठी येणार्‍या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जनगणना संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जनगणना कामासाठी नियुक्त केलेले चार्ज अधिकारी आणि त्यांना सहाय्य करणार्‍या कर्मचारी यांची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा न्यू आर्टस महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक एस. एन. पायस, आर. ए. चिंधे,  एस.एस. मुळीक, एस. आर.नाईक, उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार वैशाली आव्हाड आदींची यावेळी उपस्थिती होती.
या प्रशिक्षण कार्यशाळेस सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी व संबंधित जनगणना काम पाहणारे कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले.
यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना  द्विवेदी म्हणाले, जनगणना हा देशाच्या महत्वाच्या कार्यक्रमांपैकी एक महत्वाचा कार्यक्रम आहे. सन 1872 रोजी सर्वप्रथम जनगणना करण्यात आली. त्यानंतर दुसरी जनगणना सन 1881 रोजी झाली. त्यानंतर अखंडीतपणे  दर दहा वर्षांनी ही जनगणना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशाची विविध धोरणे, योजना आखताना या जनगणनेचा उपयोग होत असल्याने त्यास महत्व आहे. त्यामुळे सर्व घटकांनी ही माहिती येणार्‍या प्रगणकांना उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहृन त्यांनी नागरिकांना केले. श्रीमती मित्तल यांनी जनगणनासारख्या महत्वाच्या कार्यक्रमाचे महत्व ओळखून सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जनगणना संचालनालयाचे उपसंचालक पायस म्हणाले, ही सोळावी जनगणना असून या जनगणनेमध्ये प्रथमच मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येणार आहे. पेपर मोड आणि अ‍ॅप्लीकेशन मोड अशा दोन्हीमध्ये माहिती भरण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.