Breaking News

शाळेकडून बेकायदा पैशांची मागणी


अहमदनगर/ प्रतिनिधी : शहरातील तपोवन रोड येथील केसर एज्युकेशन फाउंडेशन प्रायमरी नर्सरी शाळेत मुलांच्या अ‍ॅडमिशनकरिता डोनेशनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे पैशाची मागणी होत  आहे. अशा संदर्भात पाइपलाइन रोड, हडको येथील रहिवासी अश्‍विता कोड्रा यांनी जिल्हा परिषद येथील उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे यांना निवेदन दिले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील तपोवन रोड येथील केसर एज्युकेशन फाउंडेशन प्रायमरी नर्सरी शाळेत वार्षिक फी रक्कम 19 हजार 500 आहे. या वार्षिक फीमध्ये मागील वर्षी 17 टक्के वाढ करून रक्कम 22 हजार 500 आमच्याकडून घेतलेले होते. परंतु चालू वर्षी शाळेने बेकायदेशीर रित्या पालकांकडे वार्षिक रक्कम रुपये 25 हजार 500 ची मागणी केली आहे. तसेच शाळेच्या इमारत उभारण्याकरिता रुपये 10 हजाराची अतिरिक्त मागणी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून  करीत आहे. ही संपूर्ण रक्कम 35 हजार 500 भरल्यास तुमच्या पाल्यांना शाळेत शिक्षण घेता येईल अन्यथा त्यांना या शाळेमध्ये  शिकता येणार नाही, अशी तंबी देत बेकायदा पैशाची मागणी केली.

अतिरिक्त रक्कम भरण्यास कोड्रा यांनी नकार दिला असता संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी  कोड्रा यांना सांगितले की, तुम्ही जर पूर्ण रक्कम भरली नाही तर तुमच्या मुलास आम्ही नवीन इमारतीमध्ये बसू देणार नाही तर पत्र्याच्या खोलीमध्ये बसविण्यात येऊन त्याला इतर अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे शाळेतील इतर सोयीसुविधा स्पोर्टस्, गॅदरिंग, शैक्षणिक सहल व इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेता येणार नाही व त्यांची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील, असे म्हणून आम्हाला अरेरावीची भाषा केली.

शाळेचे कामकाज ’हम करेसो कायदा’ या पद्धतीने चालू असून या शाळेतील संचालक व प्राध्यापक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून बेकायदा पैसे उकळण्याच्या पद्धतीवर तत्काळ आळा घालण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन जिल्हा परिषद येथील उपशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.