Breaking News

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आपत्ती निधीतून रुग्णाच्या उपचारांचा खर्च ; २० जण देखरेखीखाली


अहमदनगर / प्रतिनिधी :
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा नगर शहरात एक रुग्ण आढळून आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याला स्वतंत्रपणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीचे (हाय रिस्क) सहवासित चार आणि कमी जोखमीचे सहवासित (लो रिस्क) चार नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. याशिवाय, नुकतेच परदेश दौरे करुन आलेल्या आठ नागरिकांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजअखेर, जिल्ह्यातील एकूण २० जण हे देखरेखीखाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. अशा रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोरोना विषाणू संसर्ग आणि त्याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणेच्यावतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते. नगर शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा एक रुग्ण आढळून आला असला तरी त्याची प्रकृती स्थिर असून सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे त्याला आढळून आलेली नाहीत. मात्र, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तत्पर असून या रुग्णाच्या संपर्क आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाची माहिती घेतली असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. इटलीहून आलेल्या एका नागरिकाच्या संपर्कात आलेल्या तीन जण, दुबईहून आलेल्या नागरिकाच्या संपर्कात आलेले आठ जण आणि परदेश दौर्याहून आल्यानंतर तपासणी केलेले आठ जण असे वीस जण देखरेखीखाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपण जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थानचे हॉस्पिटल आणि शनिशिंगणापूर येथील देवस्थानचे हॉस्पिटल येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी स्वताहून काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणे टाळावीत. चित्रपटगृहाना स्वच्छतेबाबत निर्देश दिले असून त्यांना आवश्यकता वाटत असेल तर ते बंद ठेवू शकतात. मात्र, अशा सूचना प्रशासनाने दिल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी जाऊन आलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग अथवा तपासणीसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या उपचार आणि कार्यवाहीवरील खर्चासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व राज्यांना निर्देश दिले असून या उपचारावरील खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून करण्यास मान्यता दिली आहे. दुर्दैवाने अशा प्रकारच्या संसर्गातून मृत्यू झाल्यास कुटुंबियांना लाख रुपये मदत, कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तीचा रुग्णालयात दाखल होण्याचा खर्चाची तरतूद या निधीतून करण्यात येईल. याशिवाय, रुग्णाला अलग ठेवणे, नमुना संकलन आणि स्क्रीनिंगसाठी उपाय, कोरोनाच्या प्रतिसादासाठी आवश्यक उपकरणे खरेदी, स्कॅनर्स, व्हेंटिलेटर, ए्अर प्युरिफायर अशा सुविधा तात्काळ उपलब्धसाठी यातून निधी उपयोगात आणण्याबाबत निर्देश दिले असल्याचेही श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. जिल्हा  सामान् रुग्णालय, अहमदनगर येथे कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन ( ०२४१ - २४३१०१८) करण्यात आला असून तो २४ तास कार्यरत राहणार आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा १०७७ या टोल फ्री क्रमांकावरुन नागरिकांना मूलभूत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.