Breaking News

'त्या' नागरिकांना प्रशासनाच्या सहकार्याची प्रतीक्षा


अहमदनगर / प्रतिनिधी :  
गेल्या महिन्यात अवतार मेहेरबाबा यांच्या अमरतिथी दर्शनासाठी आलेल्या २२ इराणी आणि जपानी नागरिकांवर कोरोना व्हायरसमुळे अहमदनगरमध्येच अडकून राहण्याची वेळ आली आहे. अवतार मेहेरबाबा यांच्या दर्शनासाठी आलेले हे विदेशी भाविक मागील दोन महिन्यापासून अहमदनगरमध्येच आहेत. दरम्यान, त्यांना या महिन्यात आपल्या देशात म्हणजेच इराण आणि जपानला जायचं होतं मात्र, कोरोना व्हायरसमुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्यातच त्यांच्याकडे असलेले पैसेदेखील संपले असून अहमदनगर जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत, अशी तक्रार मेहेराबाद येथील नागरिकांनी बोलवून दाखविली.
दरम्यान, जोपर्यंत परदेशी नागरिकांकडे व्हिसा असतो, तोपर्यंत मेहेराबाद मंदिर प्रशासन त्यांची मदत करते.  मात्र आता व्हिसा संपला असून जिल्हा प्रशासन या विदेशी भाविकांकडे लक्ष देत नाही. मंदिर प्रशासनाने त्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिले असून मेहेराबाद येथील काही सामाजिक संस्थांनी त्यांना किराणा सामान उपलब्ध करून दिले आहे. त्यांना मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूमुळे तरी हे भाविक स्वःत आपल्या हाताने अन्न तयार करून खात आहे. 'कोरोनामुळे आमचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आम्हांला आमच्या देशात जाता येत नाही, आम्ही येथे येताना जेवढे दिवस राहायचं होतं, तेवढेच पैसे आणले होते. मात्र, आता आमचे पैसेदेखील संपले आहेत. आमचा व्हिसा रद्द झाल्यामुळे आम्ही आमच्या देशात जाऊ शकत नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे,' अशी खतं या परदेशी नागरिकांनी व्यक्त केली आहे. येथील प्रशासनाने त्यासंबधी लक्ष देण्याची मागणी ते करत आहेत.