Breaking News

वरिष्ठ का करताहेत 'पोलीस मॅन्युअल'चे उल्लंघन? बदली होऊनही कर्मचाऱ्यांना का सोडत नाहीत?


सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदलीचा कायदा लागू करून अनेक वर्षे झाली. अनेक  शासकीय कार्यालयांत या कायद्याचे तंतोतंत पालनदेखील केले जाते. मात्र अहोरात्र जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेला बदलीचा हा कायदा अहमदनगर जिल्ह्यात लागू नाही, असेच चित्र हल्ली पहायला मिळत आहे. शहर आणि परिसरातील हद्दीत असलेल्या पाच पोलीस ठाण्याअंतर्गत काम करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर निघून तब्बल एक वर्षाचा काळ उलटला असावा. मात्र संबंधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडायला का तयार नाहीत, हे अधिकारी 'पोलीस मॅन्युअल'चा भंग का करताहेत, असे अनेक प्रश्न पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पडले आहेत. या प्रश्नावर प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि नाशिकचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे हे गांभीर्याने लक्ष देऊन पीडित पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय देतील का, याची पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.
सहावा, सातवा वेतन आयोग लागू झाला नाही, पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी झाली नाही किंवा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण झाली, एखाद्याने शासकीय कामकाजात अडथळा आणत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली किंवा मारहाण केली किंवा पगारवाढ लागू झाली नाही तर शेकडो सरकारी कर्मचारी रस्त्यावर येतात, आंदोलन करतात, निषेध नोंदवितात. मोर्चांद्वारे गर्दी करून वेळप्रसंगी निषेधाच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडतात. आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान चार दोन सरकारी कर्मचारी संघटनांची आंदोलने नगरकरांनी पाहिली आहेत, अनुभवली आहेत. मात्र आपल्या हकाच्या मागण्यांसाठी किंवा वरिष्ठांच्या अन्यायकारक वर्तणुकीच्या विरोधात शेकडो पोलिसांनी एकत्र येत भव्य असा मोर्चा काढला, निषेधाच्या घोषणा दिल्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, असे प्रकार आतापर्यंत कोणीच स्वप्नातही पाहिलेले नाहीत. कारण पोलिसांना संघटनात्मक हालचाली करायला घटनेने बंदी घातली आहे. का, ते सरकारी कर्मचारी नाहीत? त्यांना मागण्या मागण्याचा अधिकार नाही? वरिष्ठांच्या अन्यायकारक वर्तणुकीविरोधात न्याय मागण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही? त्यांच्या काहीच मागण्या नाहीत? पोलीस हा माणूस नाही? त्याला काहीच भावना नाहीत? पोलीस दलात कार करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे काहीच प्रश्न नाहीत? महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सलग आठ दिवस रात्रीची ड्युटी करायला आनंद वाटतो का? त्यांना कौटुंबिक अडचणी नाहीत का? या सर्व प्रश्नांच्या मुळापर्यंत जाऊन पोलीस दलातील अधिकारी गांभीर्याने कधी तरी विचार करणार आहेत की नाही? सारेच पोलीस कर्मचारी मॅटमध्ये जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागू शकतात का? दरम्यान, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील काही वरिष्ठ अधिकारी बदलीच्या ठिकाणी सोडत नाहीत, हे वास्तव समोर आले आहे. अनेक महिला पोलीस कर्मचारी हा मनस्ताप सहन करत आहेत. एक महिला पोलीस कर्मचारी अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे बदलीच्या ठिकाणी हजर होण्याची परवानगी मागत आहे. तिच्या मुलाच्या आजाराचा आणि शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला बदलीच्या ठिकाणी सोडत नाहीत, बदलीच्या हजर करण्याचे पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार चर्चेतून समजला आहे. मात्र त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांचा नाहक त्रास होऊ शकतो म्हणून माहित असूनही आम्ही त्या पोलीस ठाण्याचे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव प्रकाशित करू शकत नाही. हा सारा प्रकार प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि नाशिकचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांच्या कानावर जावा, यासाठीच आमचा हा शब्दप्रपंच आहे.
'एलपीसीं'ना नकोय का महिलादिन?
आजच्या जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून अनेक सामाजिक संघटनांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्वान महिलांचे कौतूक करत भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. अर्थात यात गैर काहीही नाही. ज्या महिला कर्तृत्वान आहेत, त्यांना त्यांच्या कार्याची पावती मिळायलाच हवी. पण मग पोलीस दलात सलग आठ दिवस रात्रीची ड्युटी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यांच्या घरादाराची काहीच त्याग नाही का? या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे दखल घेण्याजोगे किंवा वर्षांतून एकदा कौतूक करण्यासारखे काहीच कर्तव्य नाही का? मग विविध पोलीस ठाण्यात सततच्या कामात खितपत पडलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कोणत्या तरी एखाद्या सामाजिक संघटनेने एखादे गुलाबाचे फुल देऊन जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा का दिल्या नाहीत? या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना महिलादिन नकोय का? निदान आगामी आठ दिवसांत तरी एखाद्या सामाजिक संघटनेने यासाठी एकदा तरी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्याचे 'धाडस' करावेच.