Breaking News

कोयत्यावरचं कोक

(मागील अंकावरून)
मुंडेसायबाची गायली गाणी
आमच्या तुटे नाय डोयाचं पाणी गं..
आणि मग उत्तम कांबळे बोलले.
नेहमीसारखं. बंदुकीच्या गोळीसारखं.
आपल्याला अजुन कोक म्हणजे काय हे सुध्दा माहिती नाही. कोक म्हणजे गर्भाशयाची पिशवी. नाशिकला सकाळीसकाळी दोघे भाऊ बहिण माझ्या घरी आले होते. भाऊ म्हणाला, बहिणीचा कोक काढायचाय. कुणी वळकीचंं डॉक्टर असतील तर सांगा स्वस्तातलं. मी म्हंटलं, का काढायचा कोक? तर म्हणाला, आवो, हिला तीन पोरं हायती अगोदरची. आता परत पाळी आली तर चार दिसाचं खाडं हुतं ना कामाचं. चार दिस रोजगार बुडतो. असं चार चार दिस करत सहा महिन्याचं अठरा वीस हजार रुपये झाले सायेब. असं चाललं तर मुकादमाकडची उचल कशी फेडायची आमी? व्याज तर वाढत चाललं नुसतं. किती दिस हे कोक छळणार अजून? ते काढूनच टाकलं एकदाचं तर रोजगार तरी भेटंल.  बहिण खाली मान घालून बसली होती. म्हणाली, आमच्यातल्या लय बायकांनी काढून टाकला ना कोक. काय करायचं ठिऊन? माझ्या अंगावर काटा आला. मी म्हंटलं, कुठं केलं हे सगळं? कुणी केलं? तर म्हणाले, दिसल त्या मार्गानं करत्यात बायका. परवडायला बी पायजे कीदोघं बोलत होती. ते ऐकूनच मन सुन्न होत होतं. काही सुचेचना. अस्वस्थता वाढायला लागली.
मग यावर मी सविस्तर लेख लिहिला. त्यावर मग शासनानं कमिटी नेमली. सरकारी आकडा बाहेर आला. तो होता 16 हजार. सरकारच्या आकडेवारीनुसार तब्बल 16 हजार बायकांनी कोक काढून फेकला होता. पण मला खात्री आहे की हा आकडा 70 हजाराच्या घरात असणार. सरकारनं हुकूम काढला. सरकारला विचारल्याशिवाय कोक काढायचा नाही.  सरकारी नोकरीत बायका असतात त्यांना बाळंतपणाची सहा सहा महिने रजा मिळते. जो बाळंत होत नाही त्या तिच्या नवर्याला पण रजा मिळते. त्या बायकांचा आणि ऊसतोडवाल्या बायकांचा कोक वेगळा आहे का? ऊन-वारा-पाऊस सोसून या बायका बाळंत होतात. कितीतरी बायका ऊसाच्या फडात बाळंत होतात. कर्जासाठी बायकांना गर्भाशयाची पिशवी काढायची वेळ येते. त्याला हजारापासून सत्तर हजारापर्यंतचे दर सुरु आहेत. कितीतरी बायका यात दगावल्या. भाकरी बुडू नये म्हणून बायकांना गर्भाशय काढून जीवानिशी जायची वेळ येत असेल तर हा समाज सगळ्यात नालायक, विद्रूप, कुरुप समाज आहे. पोटासाठी त्यांना रजा पण घेता येत नाही. रजा राहिली पण त्यांना किमान मासिक पाळीच्या काळातला चार दिवसांचा घरपोच पगार तरी द्यावा अशी आमची सरकारकडं पहिली मागणी आहे. यासाठी मंत्र्यांना पत्रे पाठवणार आहे. पाठपुरावा करणार आहे. पुढच्याच महिन्यात बीडमध्ये या मागणीसाठी मोठी सभा घेणार आहे. घाव घालूनच व्यवस्था बदलायची वेळ आली आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संचालक गौतमभाऊ पाटील आणि दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतरावदादा पाटील या दोघांनीही या मागणीसाठी आम्ही सारे आपल्यासोबत आहोत असा शब्द दिला. ऊसतोड कामगारांसाठी काम करणारा दादा काळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ आलं. आयाबायांनी कोयता बाजुला ठेऊन तिळगुळ वाटायला सुरवात केली. तिळगुळ खात सूर्य मावळला. उद्याचा सूर्य नवा असणार आहे. रविंद्र खेबुडकर साहेबांचा फोन आला. ते सांगली महापालिकेत आयुक्त होते. त्या अगोदर जिल्हा पुरवठा अधिकारी होते. पण ही झाली शासकीय पदं. समाजात उतरुन त्यांच्या कामांचा पाठपुरावा करायची सवय त्यांना आहे. त्यांनी सांगितलं, विधानपरिषदेमध्ये एका प्रश्‍नाला उत्तर देताना एकनाथ शिंदेसाहेबांनी ऊसतोड महिलांचे प्रश्‍न आणि त्यांचे गर्भाशय काढण्यासंदर्भात चौकशीसाठी एक समिती नेमली होती. आमदार नीलम गोर्हे या समितीच्या अध्यक्षा आहेत. त्या 24 जुनला उपसभापती झाल्या आणि 25 जूनला मी त्यांच्याकडे जॉईन झालो. या समितीनं खूप सभा घेतल्या या प्रश्‍नावर. सोबत मी होतो. पालावरच्या ऊसतोड महिलांची जिंदगी पाहून वाईट वाटलं. साखर आयुक्त शेखर गायकवाडसाहेबांनी  या प्रश्‍नी सकारात्मक भुमिका घेतली आणि अनेक निर्णय तात्काळ लागू केले. पुढच्या सिझनपासून हे बदल नक्की दिसतील. शेखर गायकवाडसरांच्या निर्णयांमुळं ऊसतोड करणार्या आयाबायांना माणूस म्हणून हक्क मिळतील. त्याचा अहवालही शासनाला सबमिट झाला आहे आणि महामंडळ स्थापन करायचा निर्णयही झाला आहे. खेबुडकरसाहेबांनी दिलेली ही बातमी खूप आनंदाची आहे. हा लेख लिहीता लिहीताच ती मिळाली. आता फक्त या निर्णयांची अंमलबजावणी मात्र तात्काळ व्हायला हवी. हे लिहीतो आहे तोवर बह्यावरनं दोस्त सुरेश मोहितेनं सकाळीच त्याची कविता पाठवली आहे. ती वाचतो आहे. डोक्यातली कोयतंवाली आता हातात पेन घेऊन उभा राहिलेली दिसते आहे.
भर दुपार
ऊसावर कोयत्याचे सपासप वार
ती ओली बाळंतीण
दोनच महिन्याच्या लेकराची
काजळ नसलेल्या डोळ्यांची
शेवरीला बांधलेला धडप्याचा झोळा
आणि त्यात वळवळता एक
मांसाचा लालभडक गोळा
लुकलुकत्या डोळ्यांनी कुठलं भविष्य बघत असेल या देशात?
कोयत्याच्या प्रत्येक घावाबरोबर
पाझरणारी तिची स्तनं
आणि घामाच्या थेंबाथेंबातून झरणारी
शतकानुशतकाची पिळवणूक
त्या बाईने करावी कशी
तिच्या आईपणाची जपणूक
उन्हातान्याला रापलेलं तिचं बाईपण
आणि ऊसचरक्यात पिळवटून गेलेलं आईपण
पोटाला कशाचीच पर्वा नसते.
ऊसाच्या फडात नसताना बाळंतपणाची पथ्यं
लेकरासाठी अंगाई किंवा बोबडे बोल
बर्याचदा ही लेकरं सरितच जन्म घेतात
आणि सहकाराच्या नावानं
पहिलंवहिलं भोकांड पसरतात
सहकाराच्याही  कानावर पडतं कधी कधी
या लेकरांचं भोकाड पसरणं
पण सहकार धुर्तपणानं
आपली बधीर बोटं कानात घालतं
मनातल्या मनात आनंदित होतं
एक नवा कोयता जन्मास आला म्हणून.
                  (समाप्त)


नंदू गुरव