Breaking News

दहशत करोनाची: साईंच्या शिर्डीत शुकशुकाट !
शिर्डी  
  करोनाची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. आजपर्यंत चीनसह इतरही अनेक देशांमध्ये हजारो लोक या  विषाणूच्या संसर्गाने मृत्युमुखी पडले आहेत. भारतात या विषाणूने शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली. यावर खबरदारी म्हणून शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. सिनेमा हॉल, मॉल, रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्टँड, बाजारपेठा, मंदिरे ओस पडले असून सगळीकडे शुकशुकाट बघावयास मिळत आहे. याचा परिणाम साईंच्या शिर्डीतही झाला आहे.  शिर्डीत एरव्ही सत्तर ते ऐंशी हजार भाविक दररोज दर्शनासाठी येतात मात्र आता ही संख्या भलतीच रोडावली आहे.
 भाविकांनी शिर्डीमध्ये गर्दी करू नये असे आवाहन साई संस्थानने केले आहे. भाविकांनी भरलेल्या दर्शनांच्या रांगा आता ओस पडू लागल्या आहेत. याचा परिणाम शिर्डीच्या आर्थिक उलाढालींवरही झाला आहे. शिर्डीची दररोज सुमारे दोन कोटींची उलाढाल असते, ती उलाढाल 30 ते 40 लाखांच्या घरात आली आहे. अडीच ते तीन कोटी रुपये देणगी याठिकाणी जमा होत असते. आता ती केवळ दीड कोटींच्या घरात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची तपासणी साई संस्थानद्वारे करण्यात येत आहे. यावेळी संस्थानचे अनेक कर्मचारी विना मास्कचे वावरताना व भक्तांची तपासणी करताना आढळून येतात. त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न उपस्थित राहू शकतो याकडे संस्थानाने लक्ष देण्याची गरज आहे. शिर्डी तिर्थक्षेत्राच्या जवळच असलेले नाशिक, पुणे, औरंगाबाद व अहमदनगर या ठिकाणी करोनाची लागण झालेले रुग्ण मिळून आल्याने याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिर्डीत शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली असून सर्व धार्मिक, राजकीय, शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. सोमवारी साई मंदिरात तुरळक भक्त होते तर मंदिर आणि मंदिर परिसरात शुकशुकाट होता. बाजारपेठा ओस पडल्या असून दररोज दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या शिर्डी शहरात कोरोनाने व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा परिणाम वाहतूक परिवहन मंडळावरही झाला आहे. शिर्डी महामंडळ आगारात ४००-४५० बसेस येत जात होत्या. परंतु त्यांची संख्या ३०० वर आली असून त्यामध्येही घट होण्याची शक्यता आहे.

साईबाबा संस्थानने केलेल्या उपाययोजना
 करोनाचा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी साईबाबा संस्थानने अनेक उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. दक्षता म्हणून बायोमेट्रीक दर्शन पास व्यवस्थेत बोटाचे ठसे घेण्याचे बंद केले आहे. कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी बंद केली आहे. मंदिरात भक्तांना गंध चांदीच्या काडीने लावला जात आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी इन्फ्रारेड अद्यावत मशिनरीच्या माध्यमातून केली जात आहे. श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय येथे  रुग्णालयातील सर्व परिचारिका ,वार्ड बॉय, सर्व स्वच्छता कर्मचारी यांना करोनाविषयी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. साईबाबांच्या चरणी आमची निस्सीम भक्ती आहे. त्यामुळे करोनो सारख्या संकटाला आम्ही घाबरत नाही - एक साईभक्त  सध्या जगभरामध्ये करोना विषाणूची साथ सुरु असून याचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. यावर खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना संस्थान राबवत आहे. यासाठी भक्तांस विनंती आहे की, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी श्री रामनवमी उत्सवावेळी पालखी पदयात्रा घेवून शिर्डी येथे येण्याचे टाळावे - अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान.