Breaking News

साईबाबा संस्थानच्या कर्मचार्‍यांना करोनाबाबत मार्गदर्शन स्वच्छतागृहांबाबत विशेष खबरदारी


शिर्डी / प्रतिनिधी ः
साईबाबा संस्थानच्या कर्मचार्‍यांना करोना व्हायरसबाबत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. कमांडर ए. के. झेना व डॉ. राहुल वाघमारे यांनी करोनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती दिली.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास संस्थानचे प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, अशोक औटी, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे, उपमुख्यअभियंता रघुनाथ आहेर, सर्व विभागांचे प्रमुख, सर्व विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झेना आणि वाघमारे यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारी घेण्यासाठभ वापरण्यात येणा-या प्रतिबंधात्मक साहित्यांची माहिती दिली. यावेळी प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. काही कर्मचा-यांनी करोना व्हायरस संदर्भात काही शंका उपस्थितीत केल्या. या शंकांचे समाधान करुन या आजाराला घाबरुन न जाता आपल्या शरीराच्या व परिसराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, असे झेना व डॉ. वाघमारे म्हणाले.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करोना व्हायरसपासून होणार्‍या आजाराविरुध्द प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संस्थानच्या दोन्ही रुग्णालयात प्रतिबंधात्मक वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच जनजागृती करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारी घ्यायच्या माहितीचे फलक मंदिर परिसर व गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. परिसरात असलेली स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे ठिकाण व आवश्यक त्या ठिकाणी साईभक्तांना लिक्वीड सोपसह हात धुण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता देशाच्या व जगाच्या कानाकोपर्‍यातून भक्त दर्शनाकरिता येतात. त्या पार्श्‍वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.