Breaking News

महिला समानता की असमानता?

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्‍चित करण्यात आला आहे. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांचे हक्क नाकारले होते. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण होते. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया संघर्ष करीत होत्या. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, सर्व जगात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे जागृती येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला. नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या. आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे. एकोणीसाव्या शतकात, जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता, त्याचवेळी भारतातही अनेक समाज सुधारकांनी स्त्रीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्‍वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरुन चालणार नाही. तरीसुद्धा आज महिलांचे प्रश्‍न सुटले का? समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला का? दुय्यम वागणूकीतुन त्यांची मुक्तता का झाली नाही. आजही हुंड्यासाठी महिलेला जाळुन मारलं जातं. तिच्यावर अनेक निर्बंध लादले जातात. ती आजही कौंटुबिक छळाला सामोरं जात आहे.  लोकांच्या वखवखलेल्या नजरांचा आजही तिला सामना करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे आपला पुरुषप्रधान समाज हेच आहे.
        फक्त महिला दिन आला कि तिच्या स्वावलंबनतेच्या गप्पा मारल्या जातात. पण एरवी तिचा गळाच दाबला जातो. तिला अनेक कौंटुबिक आणि सामाजिक बंधने आहेत. ती स्वैरपणेे वावरू शकत नाही. पुरुषानं काही केलं तरी माफ होतं पण एका महिलेला काहीच माफ नसतं. तिला प्रत्येक चुकीची किंमत चुकवावी लागते. तिच्यात निर्णय घ्यायची क्षमता असली तरी ती निर्णय घेऊ शकत नाही. सरपंच महिला असेल तरी कारभार तिचा पती बघतो. असं अनेक क्षेत्रात आपल्याला बघायला मिळतं. नुसते दिवस साजरे करुन तिला स्वतंत्र भेटणार नाही त्यासाठी पुरूषप्रधान समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिला आज कुठे नाही?  ती विमान चालवते. रेल्वे चालवते. डॉक्टर आहे. नर्स आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने आपलं प्राबल्य दाखवून दिलं आहे. तिने आपलं स्वत्व सिध्द केलं आहे. तरीसुद्धा तिला दुय्यम वागणूक मिळत आहे. आजही तिची गर्भात हत्या केली जात आहे. भारताच्या महान असणार्या संस्कृतीमध्ये स्त्रिला खुपच मानाचा दर्जा दिला गेला आहे. तिला मांगल्याचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. तसेच तिने शेकडो वर्षांपासून अनेक आघाड्यांवर सामाजिक आणि राजकीय नेतृत्व करून आपले क्षत्रियत्व सिद्ध केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात उदभवलेले कसोटीचे प्रसंग असो वा इंग्रजांच्या काळात घडलेल्या घटना असो. ’ती’ आपल्या नेतृत्व गुणांच्या कसोटीला उत्तमरित्या उतरलेली आपण बघितलेली आहे. महाभारतात वस्त्रहरण व्हावे इतकी ’ती’ दुर्बल नक्कीच नाही. ती जितकी प्रेमळ आहे तितकीच कठोरही होऊ शकते. तिला जितके स्त्रीत्व समजते तितकेच पुरुषत्वही समजते. शारीरिक देहबोलीवरुन एखांद्याच्या भावभावना ओळखायची ताकद ती राखुन आहे, म्हणुनच की काय मुलाचे काही दुखत असेल तर ते पहिले आईला समजते, भावाला कोणाशी प्रेम झाले तर बहिणीला सांगायची गरजच पडत नाही आणि वडिलांच्या मनातील मानसिक यातनांची वादळे मुलीला सांगायची कुठल्याही बापाला गरज भासत नाही. म्हणुनच बापासाठी लाख-मोलाच्या प्रेमालाही कुर्बानी करायची मानसिक ताकद ती बाळगुन असते. अर्थात स्त्री असुनही पुरुषांच्या शारिरीक आणि मानसिक भावभावना समजुन घेण्याची ताकद निसर्गाने फक्त स्त्रीला बहाल केली आहे. म्हणुनच तिला ’मेणाहुन मऊ तसेच वज्रापेक्षाही कठीण म्हटले आहे. ती आपल्याला वेगवेगळ्या भुमिकेत आवडते. कधी ती आई म्हणून आवडते. कधी ती प्रेयसी म्हणुन आवडते. कधी ती बहिण म्हणून आवडते. ती कधी आपली सल्लागार बनुन येते. कधी आपण हरलो तर ती आपल्याला पुन्हा लढण्याची प्रेरणा देते. आपण नैराश्यग्रस्त झाल्यानंतर आपल्याला जगण्याची प्रेरणा देणारी एक महिलाच असते. ती एक शाळा आहेत आणि त्या शाळेत आपण आयुष्यभर शिकत आहोत. कधी जगणं, कधी जिंकण शिकतं आहोत. आणि त्या शाळेचा कुठलाही एक ’दिन’  नसतो. ती रोज आपल्याला अविरतपणे शिकवतं असते. तिला सुट्टी नसते. ती आपल्यासाठी कष्टत असते. समाजातील लोकांनी एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे कि आपल्या आई आणि वडीलांवर मुलीइतके प्रेम करणारा मुलगा असु शकत नाही.  स्वतःच्या लग्नानंतर आई-वडिलांना घराबाहेर काढणारा तोच मुलगा असतो जो सर्वांनी वंशाचा दिवा म्हणून आयुष्यभर सांभाळलेला असतो पण जिची आयुष्यभर नफरत केली जाते आणि जिला आईवडिलांच्या उपहासाच धनी व्हावे लागले ’ती’ म्हातारपणी आई-वडिलांची काठी बनुन खंबीरपणे उभी राहते. आपला नवरा वारल्यानंतर परिस्थिती आणि समाजाशी दोन हात करत आपला संसार भक्कमपणे करुण  दाखविणार्या महिला समाजात आपण बघितलेल्या आहेत. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाची शिखरे सर केली आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिलाही जिने मला जगणं शिकवलं..
दत्ता पवार
 मो. 9657608332