Breaking News

शाब्बास नगरकर! 'कोरोना'च्या राष्ट्रीय संकटाचा मुकाबला कौतुकास्पद! आता मिशन 'जनता कर्फ्यू'!


चीनमधून आलेल्या कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशाने शहर आणि परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात आज, दि. २० जो कडकडीत बंद पाळण्यात आला, तो नुसताच कौतुकास्पद नाही, तर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र अजूनही काही बेफिकीरीने वागत आहेत. काम धाम नसताना रस्त्यावर फिरत आहेत. यातील कोणाला कोरोनाची लागण झालेली असल्यास त्याला ओळखायचे कसे, याचे काहीच मोजमाप नाही. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र फिरु नये. जेणेकरून या विषाणूचा फैलाव नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी दि. २२ रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत अशा १४ तास 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली आहे. या कर्फ्यूची अंमलबजावणी शंभर टक्के जर झाली तर कोरोनाच्या विषाणुची साखळी तुटणार आहे. जास्तीत जास्त नागरिक या आजाराच्या प्रभावाखाली येऊ नये, यासाठी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाप्रशासनाने कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. वास्तविक पाहता जनता कर्फ्यू पाळणे किंवा दि. ३१ मार्चपर्यंत राज्यशासनाचे आदेशाचे पालन करणे, हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य करण्यासाठी एक तर आदेशाची गरजच पडू नये आणि त्यानंतर संबंधितांविरुद्ध जी कारवाई होणार आहे, ती तर शासकीय कामकाजाचा एक दुर्दैवी असा भाग राहणार आहे. कारण कोरोनापासून आपल्या देशबांधवांचे मोठ्या मजबुतीने संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येकाने जनता कर्फ्यूमध्ये विनाकारण कुठेही फिरू नये, 'अरे काय होत नाय' असे बेजबाबदारीने बोलून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. जिल्हाप्रशानाचे आदेश पाळणे म्हणजे आपल्या देशबांधवांचे रक्षण करणे होय, अशा सकारात्मक विचाराने या जनता कर्फ्यूमध्ये जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. कारण कोणावरही पोलीस कारवाई होणे, ही बाब कोणासाठीच भूषणावह नाही. त्यामुळे वास्तवाचे आणि जबाबदारीचे, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून मिशन 'जनता कर्फ्यू'च्या काळात जबाबदारीने वागा, हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे.
लपून छपून व्यवसाय करू नका!                                      
डॉक्टर्स आणि पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे आपले कार्य करत आहेत. मात्र काही रिकामटेकडे लोक काही कारण नसताना ठिकठिकाणी  ग्रुप करून जमा झाले आहेत. पोलीसांना कुठल्याही प्रकारचे मास्क पुरविण्यात आले नसल्याने स्वतःचाच रुमाल तोंडाला बांधून ते ड्युटी करत आहेत. ठिकठिकाणी जमा झालेल्या जमावाला घरी जाण्यास सांगत आहेत. हे सर्व पोलीस आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी काम करत आहेत. हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे ठिकठिकाणी जमावाने बसू नका. कारण नसताना रस्त्यावर फिरू नका आणि सर्वात महत्तवाचे लपून छपून हॉटेल आणि इतर व्यवसाय करू नका.