Breaking News

आ. पवार 'गिरीराज स्पंदन पुरस्काराने' सन्मानित कर्जत/प्रतिनिधी
 जलसंधारण, आरोग्य, पाणी, शिक्षण, कृषी, महिला, सक्षमीकरण, वृक्षसंवर्धन, क्रीडा, कृषी पुरक व्यवसाय, कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, साखर महामंडळ अशा अनेक क्षेत्रात भरीव काम करत आमदार रोहित पवार यांनी राज्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत बारामती येथील गिरीराज हॉस्पिटलच्या वतीने गिरीराज स्पंदन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.रमेश भोईटे, सचिव निर्मला भोईटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 गिरीराज हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅन्सर निदान, शस्त्रक्रिया किमोथेरपी शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. . रोहित पवार म्हणाले, जैन सोशल फाऊंडेशन आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्याने गिरीराज हॉस्पिटलकडून नियमितपणे विविध आरोग्य शिबिरे भरवून अनेक गरजू कुटुंबातील रुग्णांवर उपचार केले जातात हे कौतुकास्पद आहे. आरोग्य हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यादृष्टीने आपण 'अनंत आरोग्य योजना' सुरु केली आहे. आघाडी सरकारच्या काळात २००९ मध्ये सुरु केलेल्या 'महात्मा फुले जीवनदायी योजनेसाठीही अंदाजपत्रकात भरीव तरतूद करुन सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांवर मोफत उपचार करता येतील. त्यामुळेच आजपर्यंत सुमारे दोन हजारापेक्षा अधिक सर्वसामान्य रुग्णांवर काही सामाजिक संघटना आणि आपल्या फाउंडेशनने साडेनऊ कोटी रुपयांची मदत केल्यामुळे मोफत उपचार करता आले याचे समाधान आहे. दिवंगत डॉ.आप्पासाहेब पवार आणि शरदचंद्रजी पवार यांनी लावलेल्या सामाजिक जाणिवांच्या बीजाचं आज वटवृक्षात रुपांतर झालं आहे. त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी वडील राजेंद्र आई सुनंदा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडत आहे. वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी हा सन्मान मला नेहमीच बळ देत राहील.
 - . रोहित पवार
आमदार,कर्जत जामखेड