Breaking News

आयपीएलला परवानगी देऊ नका ! याचिका दाखल

खेळाडूंना चाहत्यांच्या गराड्यापासून दूर राहण्याच्या सूचना
मुंबई ः करोनाने जगभरात थैमान माजवले आहे. कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत 3661 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरने बाधित असलेल्या संशयितांची संख्या जबळपास 60 पर्यंत गेली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) खेळवायची की नाही, यावर चर्चा सुरू आहे. पण, ही स्पर्धाच रद्द करण्यात यावी, यासाठी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात केंद्र सरकारनं बीसीसीआयला आयपीएलचे सामने खेळवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. वकील जी अ‍ॅलेक्स बेंझीगर यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी म्हणजेच 12 मार्चला न्यायाधीश एमएम सुरेंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ’’जागतिक आरोग्य संघटनेच्या ( थकज)च्या वेबसाईटवरील माहितीनुसार अजूनपर्यंत कोरोना विषाणू रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शोध लागलेला नाही,’’ असे याचिकाकर्त्यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्यानं होत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. ला लिगाचे प्रथम आणि दुसर्‍या विभागीय लढती बंद स्टेडियमवर खेळवण्याच्या वृत्ताला ला लिगानेही दुजोरा दिला आहे. स्पॅनिश क्रीडा उच्चायुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय स्पेनमध्ये होणारे सर्व आंतरराष्ट्रीय स्तराचे सामनेही प्रेक्षकांविना खेळवण्यात यावे, असा फतवा त्यांनी काढला आहे. ’’क्रीडा उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन आठवडे ला लिगा सँटेडर आणि ला लिगा स्मार्ट बँक सामने बंद स्टेडियवर खेळवण्यात येणार आहेत,’’ असे निवेदन ला लिगाने जाहीर केले. ला लिगावर क्रीडा मंत्रालयाची नजर आहे. रेआला माद्रिद आणि एैबर यांच्यात शुक्रवारी होणारा सामना बंद स्टेडियमवर खेळवण्यात येणारा पहिला सामना असेल. स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचे 1500 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ला लिगाच्या या घोषणेमुळे युरोपियन स्पर्धेतील सामन्यांवरही परिणाम होऊ शकतो. बार्सिलोना आणइ नेपोली यांच्यातील चॅम्पियन्स लीगचा 18 मार्चला होणारा सामना बंद स्टेडियमवरच खेळवण्यात येणार आहे.
क्रिकेट सामन्यादरम्यान चाहते नेहमीच स्टार क्रिकेटर्ससोबत सेल्फी आणि त्यांची स्वाक्षरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर चाहत्यांना क्रिकेटर्सच्या सहवासात जाण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने देशातही दहशतीचे वातावरण आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. याच पार्श्‍वभूमीवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार्‍या एकदिवसीय मालिके दरम्यान भारतात दाखल झालेल्या दक्षिण आफ्रिकेन संघाला काही खास सूचना देण्यात आल्या आहेत.  क्विंटन डिकॉक आणि फाफ डुप्लेसी यांना सूचना पत्रकाच्या माध्यमातून खबरदारी आणि उपायाच्या संदर्भात काही सूचना देण्यात आल्याचे समजते. यात प्रेक्षकांसोबत संवाद टाळणे त्यांच्यासोबत सेल्फी न काढणे तसेच हस्तांदोलन न करणे याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही नियमावली केवळ दक्षिण आफ्रिका दौर्‍यापूर्वी नाही तर आगामी आयपीएल स्पर्धेसाठीही लागू असेल, असेही बोलले जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत असलेल्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना कोरोना विषाणुपासून खबरदारी आणि उपाय यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशातून यात्रा करुन आलेल्या खेळाडूंना स्वत:सह आपल्या सहकार्यांना अरोग्याच्या सुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. यात क्रिकेट चाहत्यांसोबत सेल्फी न काढणे त्यांच्यासोबत हस्तांदोलन न करणे यासह अन्य काही सूचनाही समाविष्ट आहेत. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळणार असल्याचेही संकेत दिले आहेत. 

चौकट . . . . .
क्रीडा स्पर्धांवर करोनाचे सावट
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार करोना विषाणूवर अद्याप कोणतही ठोस औषध मिळालेलं नाहीये. त्यातच आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये या विषाणूचा प्रादूर्भाव झाला तर चिंतेचं कारण निर्माण होण्याची शक्यता आहे, यासाठी केंद्र सरकारने आयपीएलला परवानगी देऊ नये, यासाठी ही याचिका दाखल झालेली आहे. आयपीएलव्यतिरिक्त जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धांवर करोनाचे सावट आहे. जुलै महिन्यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही संकटात सापडलेली आहे. महाराष्ट्रातही आयपीएलचे सामने होऊ द्यायचे की नाही यावर विचारमंथन सुरु आहे. त्यात बीसीसीआयने मात्र आयपीएल स्पर्धा होणारच अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आगामी काळात आयपीएलसंदर्भात काय भूमिका घेतली जातेय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.