Breaking News

डॉ. संगीता तोडमल यांना छ्त्रपती संभाजीराजे साहित्यगौरव पुरस्कार प्रदान


अहमदनगर / प्रतिनिधी :
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार सातासमुद्रापार करणा-या साहित्यप्रेमी डॉ. संगीता तोडमल-इँगुळकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय छ्त्रपती संभाजी महाराज साहित्य कला गौरव पुरस्कार नुकताच  सासवड येथे साहित्य संमेलनात देण्यात आला.
सासवड (ता. पुरंदर) येथे गुरुवारी दि.१२ मार्च रोजी राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात डॉ तोडमल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष अँड. शिवाजीराव कोलते होते. मानपत्र, शाल श्रीफळ, ग्रंथभेट देऊन डॉ. तोडमॉ यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. तोडमल या मूळच्या नगर जिल्ह्यातील बायजाबाई जेऊर येथील असून त्यांनी प्रारंभी पुणे शहरात पत्रकारिता आणि सामाजिक कामाला सुरवात केली. अमेरिकेत गेल्यावर त्यांनी डॉक्टरेट मिळविली. त्याचबरोबर मराठी भाषेचे मराठीपण जोपासले.  त्यांनी तेथील मराठी बांधवांना एकत्र करून आपला संस्कृतिक वसा पुढील पिढीला समजावा, त्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले. तसेच मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या कामातही त्यांनी मोठे योगदान दिले.  अमेरिकेतील मराठी माणसाच्या मनात मराठी भाषेची, संस्कृतीची गोडी वाढविण्यासाठी त्यांचे पती निलेश इंगुळकर यांनीही त्यांना मोलाची मदत केली. दरम्यान, डॉ. तोडमल यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.