Breaking News

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

अहमदनगर/ प्रतिनिधी : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जमू नये, यासाठी उपाययोजना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार, जिल्ह्याच्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या, सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील  दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा, दूध व भाजीपाला व अन्य  जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून), चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि नाट्यगृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. याशिवाय, जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांसाठीही परवानगी दिली जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
करोना विषाणूचा (कोव्हीड 19)  प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी हा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार दि.31 मार्चपर्यत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत, सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार दिनांक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील 10 वी व 12 वीच्या  परीक्षा तसेच विश्‍व विद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. तसेच, आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्याच्या संपर्कात येणार नाहीत यासाठी आवश्यकती दक्षता व खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित संस्थाप्रमुखाची राहील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपावेतो परवानगी  देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी देण्यात आली असल्यास परवानगी रद्द करण्याच्या सूचना साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा, दूध व भाजीपाला व अन्य  जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून) साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार दिनांक 31 मार्चपर्यत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय  महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने अवज्ञा केल्यास ही बाब भारतीय दंडसंहिता 1860 (45) यांच्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.