Breaking News

जलवाहतुकीच्या सेवेत रो रो मैलाचा दगड ठरेल : मुख्यमंत्री ठाकरे


मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीमध्ये अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे.
भाऊचा धक्का ते मांडावा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात हा महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल अशी ही घटना. या सेवेमुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. शासनाने मांडावा जेट्टी येथे यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले असून किनारपट्टीच्या भागात सर्वत्र अशी जलवाहतूक सुरू करता येईल का ते आम्ही पाहत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या सेवेनिमित्त रायगड व कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रायगडसह कोकणात चिपळूणपर्यंत जाणार्‍या प्रवाशांसाठी ही फेरीसेवा उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला आहे. कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, असे कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या सेवेस त्यांनी आज आपल्या शुभेच्छाही दिल्या. या सेवेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून मांडवा जेट्टी येथे 150 कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर येथून देखील लवकरच जलवाहतूक सुरू करण्याची तयारी आहे. भाईंदर ते डोंबिवली अशा जलवाहतुकीच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळून दोन वर्षांत तीही सेवा सुरू होईल. एकूणच जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार वाढविला जाईल, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात. भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर 19 किमी असून या जलवाहतुकीने एक तासात कापता येते. रस्त्याने जाण्यासाठी चार तास लागतात. रो पॅक्सची क्षमता एकावेळी 500 प्रवासी आणि 145 वाहने नेण्याची आहे