Breaking News

या चिमण्यांनो परत फिरा रे ...

सद्यस्थिती पाहता सार्‍या जगात जी महामारी पसरली आहे याचे कारण पक्ष्यांची केलेली वारेमाप कत्तल , बेजबाबदारपणा.चीनने केलेल्या चुकीचा सजा आज सार्‍या जगाला भोगावी लागत आहे.पक्षी असो की कोणताही प्राणी असो चीन  मधील माणसे सर्वच फस्त करत आहेत.नको नको ते खाऊन आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करत आहेत.चिमणी नावाचा पक्षी तर चीन मधून नामशेष झाला आहे.याचे कारण ही चीन चे बेजबाबदारपणे वागणे हे आहे.शेकडो चिमण्याची त्यांनी कत्तल केली.वटवाघूळ , खवल्या मांजर, साप असे अनेक पक्षी प्राणी खाऊन ते आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करून घेतात.याचमुळे आज सार्‍या जगभरात ही कोरोनाची दहशद पसरली आहे.शेकडो माणसे या कोरोना च्या व्हायरस मुले मुत्यूमुखी पडले आणि असंख्य माणसे या रोगापासून ग्रस्त आहेत.मोठ्या तेजीने हा कोरोना व्हायरस पसरत आहे.पाहता पाहता सार्‍या जगात थैमान माजवले आहे.

एक घास चिऊचा,एक घास काऊचा असं म्हणत काऊ ,चिऊ च्या गोष्टी सांगून लहान मुलांना घास भरवला जायचा.पण काळ बदलला आणि ही चिऊ कुठेतरी भुर उडून गेली ,केंव्हा हे कळलंच नाही.कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणीशी चिऊताई जुळलेली आहे.अंगणात मुक्त वावरणारी ,घरात चिवचिवाट करणारी चिऊ म्हणजे लहान थोरांचा अगदीच कुतूहलाचा विषय आहे.
निसर्गाच्या साखळीतील एक अत्यंत महत्वाचा पक्षी म्हणजे चिमणी होय.एक प्रकारचं सफाई कामगार म्हणून काम करणारी चिऊताई कारण छोटे मोठे कीटक,मुंग्या,अळी, किडलेलं धान्य हे तीचं खाद्य आहे.चिमण्यांना अन्न पचनासाठी मातीच्या खड्यांचीही गरज असते.धान्यांसोबत चिमणी  लहान मोठे मातीचे खडे खाऊन आपली पचनसंस्था चांगली ठेवते.वाढते शहरीकरण आणि काँक्रीटीकर यामुळे चिमण्यांना मातीचे खडे मिळनेच मुश्किल झालंय.यामुळे चिमण्या कमी झाल्यात.पक्षाचंही एक वेगळंच विज्ञान असतं.पक्षी आपल्याला मातीत लोळताना दिसतात आपल्याला वाटतं त्या सहज खेळतात पण प्रत्यक्षात तसे नसते.खरंतर चिमण्या व इतर पक्षी मातीत अंघोळ करतात.यामुळे त्यांच्या शरीरावरील जिवाणू मातीत मिळतात आणि त्यांना त्वचारोग होत नाही.पण आता मातीच कमी झाल्यामुळे चिमण्यांवर याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे.
माणसांच्या अगदी जवळ येणारा पक्षी म्हणजे आपली चिऊताई.पण या चिमण्यांच अस्तित्वच आता नाहीसं होतं की काय असा प्रश्‍न पडायला लागतो.निसर्गसाखळीत चिमणीचं महत्वाचं स्थान आहे.मातीचं घटलेलं प्रमाण, जंगलांना आगी, झाडांची वारेमाप कत्तल आणि पिकांवर केली जाणारी रासायनिक फवारणी यामुळे चिमणीचं अस्तित्वच नाहीसं होत चाललंय.
गेल्या पंचवीस वर्षात चिमण्यांचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घटले आहे.शहरी भागात तर हे प्रमाण पंचाहत्तर टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.कारण चिऊताई ला तीचं हक्कच घर मिळेनासं झालय.पिकांवर रासायनिक फवारणी आणि रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे चिमण्या हे रासायनिक धान्य खाऊन मृत्युमुखी पडतात.आपण घरी भांडी घासण्यासाठी आता तारांची घासनी वापरतो.ही घासनी उरलेल्या अन्नात,घासलेल्या अन्नाच्या आत बारीक बारीक होऊन विखुरतात.मग हे अन्न पक्षी असेच खातात.यामुळे त्यांच्या पोटात हे तार जातात आणि पक्षी मुत्यूमुखी पडतात.पूर्वीच्या काळी नारळाच्या केसाळी ची घासनी म्हणून वापर करायचे.तेही विज्ञानच आहे.पण शहरीकरण आणि राहणीमान यात बदल होत चालल्याने माणूस दिवसेंदिवस आयदी आणि कामचुकार होत चालला यामुळे याचा वापर कुणी करेनासं झालय.
आपण सर्वांनी रोबोट 2 ही फिल्म बघितलीच असेल.बघितली नसेल तर एकदा नक्की बघा.चिमण्यांची ,पक्ष्यांची गरज का आहे हे खूप प्रभावीपणे त्यात सांगण्यात आले आहे.वाढत्या मोबाईल वापरामुळे त्यासाठी लागणारे नेटवर्क टॉवर यामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.टॉवर ची अनावश्यक आणि वाढीव फ्रिक्वेन्सी यामुळे पक्षांची अंडी कमजोर होत आहेत आणि गर्भातच ते मरत आहेत.
जागतिकीकरणामुळे वन्यजीवांवर असणारे प्रेम कुठेतरी हरवत चाललय.यामुळे पक्ष्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात घटत आहे.चिमण्यांना मदत म्हणून आणि  निसर्गाचा समतोल राखावा म्हणून आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो.चिमण्यांसाठी आपण अंगणात, घरच्या छतावर धान्य ठेऊन त्यांना मदत करू शकतो आणि चिमण्यांचे घटते प्रणाम वाढू शकते .चिमण्यांसाठी कृत्रिम घरे तयार करून त्यांना सहारा देऊ शकतो.एवढाच एक पर्याय आता आपल्याकडे उरलाय.जेणेकरून आपण चिमण्यांना वाचवू शकतो त्यांचे घटते प्रमाण रोखू शकतो.चिमणी असेल तर आपण राहू.यासाठी चिमणीचेच नाही तर इतर पक्षांचेही संवर्धन करावे लागणार आहे.मानवी जीवन समस्यांच्या विळख्यात सापडले आहे आणि यातून बाहेर निघण्यासाठी पक्षी संवर्धन करणे काळाची गरज आहे.- विजय वाठोरे
 मो.नं9975593359