Breaking News

शेअर बाजाराची धूळधाण !

गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान 

सेन्सेक्स 2000 अंकांनी गडगडला ; निफ्टीत 500 अंकाहून अधिक घसरण 
मुंबई : मुंबई : जागतिक बाजारातील स्थिती आणि कोरोना विषाणूची भीती या दोन्हींचा परिणाम पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात दिसला. या दोन्ही शेअर बाजारांच्या निर्देशांकात  
सोमवारी सुरुवातीच्या सत्रात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी बाजार उघडताच 2000 अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 500 अंकांनी घसरला.  यात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
जागतिक बाजारांमध्ये शेअर्सच्या विक्रीचा सपाटा सोमवारीही कायम राहिला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरात कपात केली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचे जगात वेगाने संक्रमण 
होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम सोमवारी सकाळी भारतीय बाजारांमध्ये दिसला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण झाल्याचे सोमवारी सकाळी दिसले. एक डॉलरसाठी 
74.11 रुपये इतके मोजावे लागणार असल्याचे सोमवारी सकाळी दिसले. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 73.91 एवढ्यावर होता. वित्तीय सेवा क्षेत्राला मोठा झटका बसला आहे. गुंतवणूकदारांनी 
वित्तीय सेवा देणार्‍या कंपन्यांच्या शेअरची मोठी विक्री केली आहे. त्यामुळे बीएसई फायनान्स निर्देशांक 7 टक्क्यांनी घसरला. इंडसइंड बँक 11 टक्क्यांनी घसरला आहे. त्याशिवाय मॅग्मा फिनकॉर्प, जेएम 
फायनान्शिअल, मुथूट फायनान्स, आयसीआयसीआय बँक, उज्जीवन , ऍक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट आदी शेअर जोरदार आपटले आहेत. आजच्या सत्रात रुपयात देखील डॉलरच्या तुलनेत 17 पैशांची 
घसरण झाली आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये मात्र 10 टक्के वाढ झाली. येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी भारतीय स्टेट बँक आणि इतर सात गुंतवणूकदारांनी पुढाकार घेतला आहे. तसेच अर्थ मंत्रालयाने 
बुधवारपासून येस बँकेवरील निर्बंध दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज येस बँकेच्या शेअरला मागणी दिसून आली. शुक्रवारी शेअर बाजारात सकाळी 3400 अंकांची घसरण झाली होती. त्यामुळे ट
्रेडिंग 45 मिनिटांसाठी रोखण्यात आले होते. निर्देशांकाने ’लोअर सर्किट’ गाठल्याने बाजार नियामकांनी व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला. तासभर विश्रांती घेतल्यानंतर मात्र बाजाराची वाटचाल चांगली झाली.  बाजार बंद होताना ’सेन्सेक्स’ 1325.34 अंकांनी (4.04 टक्के) वधारून 34,103.48च्या पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सकाळी 966.10 अंकांनी घसरून (10.07  टक्के) 8,624.05च्या पातळीवर पोहोचला. मात्र, बाजार बंद होताना निफ्टी 365.05 अंकांनी वधारून 9,955.20च्या पातळीवर स्थिरावला.1987 नंतर प्रथमच बाजारात इतकी भीषण परिस्थिती निर्माण 
झाली होती. करोनाने आशियातील सर्वच भांडवली बाजारात कहर केला आहे. थायलँड, दक्षिण कोरिया, फिलिपाइन्स या देशांमधील भांडवली बाजारात निर्देशांक मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घसरले 
आहेत. त्याचे पडसाद भारतीय बाजारांवर उमटतांना दिसून येत आहे.


चौकट . . . .
रुपयाचे मुल्यही घसरले
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाचे मूल्यही 15 पैशांनी घसरल्याचे पहायला मिळाले. यानंतर सध्या रुपयाची किंमत 74.06 रुपयांवर स्थिरावली आहे. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 73,91 रुपयांवर होते.


चौकट . . . .
अर्थव्यस्थेवर करोनाचे सावट
करोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यस्थेला वाचवण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका पुढे येत आहेत. युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरांमध्ये कपात केली आहे. तसेच न्यूझीलंडच्या केंद्रीय बँकेने देखील आपत्कालिन बैठकीनंतर व्याज दरांमध्ये कपात केली आहे. यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या केंद्रीय बँकेने 27 अब्ज डॉलर पॅकेजची घोषणा केली होती. याद्वारे यूएईतील बँकांना मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियाने देखील 13 अब्ज डॉलर पॅकेजची घोषणा केली होती. याचा देखील शेअर बाजारावर प्रभाव पडत आहे.