Breaking News

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज विश्‍वचषकासाठी अंतिम लढत ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी भारतीय संघ इच्छूक


सिडनी : टी-20 महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कितीतरी अर्थांनी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. एकतर भारतीय महिला पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. अंतिम फेरी गाठून आधीच इतिहास घडविल्यावर त्यांना आता विश्‍वविजेतेपदाचा कळस चढविण्याची संधी आहे. दुसरे म्हणजे हा अंतिम सामना रविवार, 8 मार्च रोजी खेळला जाणार आहे आणि 8 मार्च हा हरमनप्रीतचा वाढदिवस (31 वा) आहे.
आयसीसीच्या कोणत्याही जागतिक दर्जाच्या स्पर्धेचा (टी-20, वन डे किंवा 19 वर्षाआतील गटाची विश्‍वचषक स्पर्धा, चम्पियन्स ट्रॉफी) अंतिम सामना आपल्या वाढदिवशी खेळणारी ती पहिलीच कर्णधार आहे आणि त्यामुळे भारत जिंकला तर अर्थातच आपल्या वाढदिवशी विश्‍वविजेतेपद कमावणारी क्रिकेटमधील पहिली कर्णधार ठरेल. तिसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनी हा अंतिम सामना खेळला जाणार आहे आणि विश्‍वविजेतेपद यापेक्षा भारतीय महिलांना या दिवसाचे चांगले गिफ्ट दुसरे कोणते नसेल. चौथी गोष्ट म्हणजे हा सामना बघायला हरमनप्रीतचे आई-बाबा हजर राहणार आहेत. आपल्या मुलीचा सामना ते प्रथमच मैदानातून बघणार आहे. त्यामुळे हरमनप्रीतला आपल्या आईला विश्‍वविजयाचे अनमोल गिफ्ट महिला दिनी देण्याची संधी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2018 च्या स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक 183 धावा करणार्‍या हरमनप्रीतची यंदाच्या स्पर्धेत बट तळपलेलीच नाही. चार सामन्यात ती फक्त 26 धावा करू शकलेली आहे आणि गेल्या तीन डावात तिला दोन आकडी धावसंख्या गाठता आलेली नाही. त्यामुळे हे अपयश धुऊन काढण्याचीही तिला संधी आहे. भारताची सलामीवीर शफाली वर्माच्या बेधडक फलंदाजीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे टाळणार आहे, अशी कबुली ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगान शुटने दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणार्‍या शुटने अंतिम फेरीसाठी संघ सज्ज असल्याचे सांगितले असले तरी स्पर्धेतील पहिल्याच साखळी सामन्यात शफालीने शुटच्या एकाच षटकात लगावलेले चार चौकार तिला अद्यापही बेचैन करतात. मला भारताविरुद्ध खेळायला अजिबात आवडत नाही.