Breaking News

राजापूरमध्ये बिबट्या पिंजर्‍यात अडकला बेलवंडी वनविभागाच्या नर्सरीत रवानगी


कोळगाव/ प्रतिनिधी :
श्रीगोंदे तालुक्यातील राजापूर येथे शेतात लावलेल्या पिंजर्‍यात रविवारी बिबट्या अडकला.
  गेल्या अनेक दिवसांपासून श्रीगोंदे तालुक्यातील राजापूर, म्हसे या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. परिसरातील शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनाही येथे घडल्या होत्या. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी राजापूरचे उपसरपंच सचिन चौधरी, माजी उपसरपंच अशोक ईश्‍वरे व शेतकर्‍यांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने राजापूर गावातील कवाष्टे मळ्यातील आप्पासाहेब चौधरी यांच्या शेतात 13 मार्च रोजी बिबट्याचा पिंजरा लावला होता.
  या पिंजर्‍यात रविवारी (दि.15) रात्री एकच्या सुमारास दीड वर्ष वयाचा बिबट्या अडकला. ही  माहिती अप्पासाहेब चौधरी यांनी वनरक्षक संदीप भोसले यांना फोनवरून दिली. त्यावरुन वनपाल मच्छिंद्र गुंजाळ, वनरक्षक भोसले, वनमजूर हनुमंत रणदिवे, बाळासाहेब थोरात, कचरू शेख यांनी जाऊन पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. हा बिबट्या बेलवंडी येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये हलविण्यात आला.वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बिबट्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे वनरक्षक संदीप भोसले यांनी सांगितले.