Breaking News

उद्योजक करीम हुंडेकरी यांच्या अपहरण कटातील मास्टरमाईंड जेरबंद एलसीबीची मध्यप्रदेशात कारवाई


अहमदनगर / प्रतिनिधी
येथील उद्योजक अब्दुल करीम सय्यद (हुंडेकरी) यांच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी अजहर मंजूर शेख याला नगर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. वेषांतर करत जीव धोक्यात घालून एलसीबी पोलिसांनी अजहरच्या मुसक्या आवळल्या आहेत. दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटेच्या वेळेस शहरातील उद्योजक अब्दुल करीम हुंडेकरी यांचे अपहरण करण्यात आले होते. २५ लाखांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद सय्यद अफरोज यांनी पोलिसांत दिली होती.
या अपहरण प्रकरणात एलसीबीच्या पोलिसांनी निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख याला जालन्यातून एका अल्पवयीन साथीदारासह अटक केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला अजहर शेख हा पोलिसांना चकवा देत पळाला होता. अटकेतील दोघांकडे केलेल्या चौकशीत या अपहरणामागे अजहर मंजूर शेख हा मास्टर माईंड असल्याचे समोर आले. तेव्हापासून एलसीबी पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुन्हेगार अजहर शेख हा मध्यप्रदेशातील शिवनी या खेडेगावी असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून मध्यप्रदेशात पाठविले. शिवनी हे गाव पेंच अभयारण्य परिसरात असून, अजहर हा दिवसभर या अभयारण्यामध्ये असतो. रात्री पिंपरवाणी, खवासा या गावामध्ये मुक्कामी येत असल्याची माहिती पोलिसांनी काढली. पोलिस पथकातील अधिकारी आणि कर्मचारी दोन दिवस तेथे तळ ठोकून होते. दरम्यानच्या काळात पोलिसांनी अझहरची सगळी माहिती संकलीत केली. वेषांतर केलेल्या पोलिसांनी अजहर रहात असलेल्या घराची पाहणी केली. मात्र दोन दिवस अजहर घरी आलाच नाही. त्यामुळे पोलिसांचा तेथील मुक्काम वाढला. तिसऱ्या दिवशी मात्र अजहर घरी येत असतानाच पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले. या कारवाईने एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.