Breaking News

महिलांचा फक्त वापर करू नका

जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करून महिलांचे गोडवे  असे गायले जातात कि महिला सक्षम व सुरक्षित आहे. भारतामध्ये कोणताही दिन साजरा करण्याचा फक्त देखावाच आहे. कोणताही दिवस वा उत्सव साजरा करण्यामागे भारतात तार्किक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसत नाही. याचे अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेत. आपण जर तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून पाऊल उचलले तर याचा सकारात्मक परिणाम भारतीय समाजावर प्रभावी होऊ शकतो. महिला दिनी महिलांबद्दल सांगायचे झाले तर महिलांचा फक्त वापर केला जातो आणि आपले सामाजिक व राजकीय अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. काही गोष्टी वाचायला कटू वाटत असल्या तरी सत्य आहेत. जागतिक महिला दिन आहे म्हणून मस्त आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करायचे, आनंदाचे वातावरण निर्मिती करून महिला किती सक्षम व कर्तृत्ववान आहेत याचा बेगडी देखावा करून महिला दिन साजरा केला जातो. बेगडी देखावा यासाठीच कि वर्षभर बलात्कार अन्याय अत्याचारा विरोधात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, रस्त्यावर उतरून पिडीत महिलेच्या न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. टिव्ही वाले बलात्कार ओरडून ओरडून पिडीतेची कथा सांगतात, देशात महिला सुरक्षित नाहीतच याची जाणीव वारंवार टिव्ही, राजकीय पक्ष करून देतात आणि समाजामध्ये त्याची पेरणी केली जाते. थोडक्यात माध्यम कोणतेही असो ब्रेकिंग न्युज मध्ये राहण्याची स्पर्धा सर्वामध्येच आहे. मग ब्रेकिंग न्युज मध्ये कसे रहायचे तर लोकांना भावनिक बनवून आणि महिलांचा वापर करून स्वतः चे अस्तित्व टिकवण्यासाठी चळवळीच्या नावाखाली काही तरी सुरू असते.महिलां बद्दल सन्मान आहे, आपुलकी व प्रेम आहे म्हणून लोक रस्त्यावर उतरत नाहीत तर हे वारंवार सिद्ध होते. देशात बलात्कार रोजच घडतात, परंतू प्रत्येक बलात्कारासाठी मोर्चे , आंदोलने, कँडल मार्च निघत नाही. काही ठराविक अंतरानेच ठराविक बलात्कारालाच उचलून धरले जाते आणि न्यायाची मागणी केली जाते. म्हणजे थोडक्यात देशात बलात्काराला आळा बसावा, महिलांवर बलात्कार होऊच नये, पिडीतेला समान वागणूक, समान न्याय येथे दिलाच जात नाही. महिलांच्या बलात्काराचे सुध्दा येथे राजकारण केले जाते. वर्षभर रस्त्यावर उतरून महिलांना न्याय मिळाला पाहिजे, महिला सुरक्षित झाल्या पाहिजे अशी ओरड करणार्‍यांनी जागतिक महिला दिना निमित्त महिला सुरक्षीत व सक्षम आहेत असे पटवून देणे म्हणजे वर्ष भरात महिलांवर झालेले अन्याय अत्याचार यावर पडदा टाकणे होय. महिलांचा सन्मान महिला दिनालाच नाही तर प्रत्येक दिवशी व्हायला पाहिजे यासाठी कोणीच काम करताना दिसत नाही. महिलांचा वापर करून टिआरपी वाढवून घेणारे अनेक चँनलवाले आहेत, बलात्कार झाल्या नंतर महिला सुरक्षित नाही म्हणणारे अनेक आहेत, वर्षभर महिलांची दु:खत कथा सांगणारे, महिलांविषयी नकारात्मक लिहणारे अनेक आहेत, पण हे सर्व जन महिला जागतिक महिला दिनाचा देखावा करण्यासाठी एकच दिवस एवढे सकारात्मक होतात की देशात महिला सर्वात जास्त सुरक्षित आहे. याच बेगडी कृत्यामुळे महिलांचा फक्त वापर केला जातो हेच समजते.
देशात बलात्कार झाला तरच महिलेला न्याय पाहिजे का? गर्भवती महिला उपचारा अभावी दवाखान्या बाहेर मरून पडते, टिव्ही वाल्यांच्या फक्त बलात्कार बलात्कार या ओरडण्यामुळे कितीतरी मुलींवर महिलांवर सामाजिक बंधने येऊन किहीचे शिक्षण सुटले तर काही महिलांचे बाहेर फिरणे कमी झाले, आजही बालविवाह करून महिलांच्या जिवनावरच बलात्कार केला जातो याची थोडीही जाणीव मिडिया, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांना असु नये म्हणजे नवलच. आजही महिलांना दुय्यम व हिन लेखून पुरुष प्रधान संस्कृती च्या नावाखाली महिलांचा गळा दाबला जातो तेव्हा कोणीच बोलत नाही. महिलांचा वापर वेळे नुसार वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात लोक तरबेज आहेत. पुर्वी हुंडाबळी साठी महिलांच्या न्यायासाठी लोक रस्त्यावर उतरत होते आता बलात्कारासाठी उतरतात याचा अर्थ अजूनही हुंडा बंदी झाली आहे वा पुर्वी बलात्कार होत नव्हते असा नाही. आपल्याला जास्त फायदा कुठे व कसा होईल या दृष्टीने आपण महिलांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो.
खरचं महिलांच्या सन्मानासाठी जर लोक जागृत असते तर वेळोवेळी महिलांचा सन्मान केला असता, बलात्काराच्या निषेध करणे म्हणजेच सन्मान नाही तर एखाद्या महिलेला ताई म्हणणे सुद्धा सन्मान आहे. एखाद्या महिलेले कठीण परिश्रमातून यश मिळवले असेल तर बलात्काराचा जेवढा गाजावाजा करतात ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गाजावाजा यशस्वी महिलांचा करायला पाहिजे पण शोकांतिका आहे अशावेळी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना एकही शब्द बोलत नाही तेव्हा समजते यांच्या मनामध्ये स्त्रि बद्दल किती आदर सन्मान आहे. लाखो महिला आहेत कि रहायला छत नाही पण आपल्या मुलांच्या शिक्षणाची, व जिवनाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतात, अनेक मुली अशा आहेत कि उराशी स्वप्न बाळगून आई वडिलांचा सन्मान राखुन काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनी घेऊन धावत आहेत. आम्ही महिलांच्या बाजुने महिलांचा सन्मान करणारे आहोत या वर्गाला कदाचित बलात्कार सोडून ईतर गोष्टिंवर लक्ष देण्याची सवड मिळत नसेल. बलात्कारा नंतर मेणबत्या लावणारे हजारो लाखो हात आहेत परंतु एखाद्या गरिबाच्या मुलीने यश संपादन केले तर एक दिवा लावणारे व मिठाई वाटणारे फक्त परिवारातील हात असतात हे चित्र बघून महिला दिनी महिला सन्मान कसा होईल हेच न कळणारे आहे. बलात्काराचा निषेध करण्यासाठी हजारो रूपये खर्च करणारे लोक असताना सुद्धां पैशाविना शाळा सोडलेल्या मुलींची संख्या कमी नाही. थोडक्यात वर्षभर महिलांविषयी नकारात्मक वातावरण निर्माण झालेले असताना जागतिक महिला दिनी महिला़चा सन्मान करणे म्हणजे फक्त महिला सन्मानाचा दिखावा होय. महिलांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व वैयक्तिक सन्मान जो पर्यंत होणार नाही तो पर्यंत महिला दिन साजरा करण्याचे सार्थकच होणार नाही.
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व नकारात्मक विसरून महिला बद्दल सर्व सकारात्मक लिहणे बोलणे यातून महिलांचा सन्मान होतो की पिडीतेचा अवमान होतो हे कळत नाही. आजही प्रत्येक ठिकाणी महिलेचा वापर करून स्वहित साध्य करण्यासाठी, व पुरोगामी म्हणणार्‍या लोकांची टोळीच येथे आहे. जाणकार व जागृत लोकांनी महिलेचा वापर न होऊ देता खर्‍या अर्थाने महिला सन्मान कसा होईल यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. खर्‍या अर्थाने महिलांचा सन्मान करायचा असेल तर महिलांचा वैयक्तिक हिताचा वापर करणे बंद करणे गरजेचे आहे.विनोद सदावर्ते
मो. 9130979300