Breaking News

नाट्यगृहात मोबाईल जॅमर बसवण्याचा पालिकेचा निर्णय


मुंबई : नाटयगृहात नाटक ऐन भरात असतांना, कुणाचा तरी अचानक फोन वाजतो, आणि नाटक बघणार्‍यांची आणि नाटक सादर करणार्‍यांची तंद्र भंग होत असल्याचे अनेक वेळेस दिसून आले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महानगर पालिकेने आपल्या नाटयगृहात मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाट्यगृहात मोबाईल जॅमर बसविण्याबाबत पालिका प्रशासनाने नागरिकांकडून हरकती सूचना मागविल्या आहेत. मोबाईलच्या कर्कश आवाजामुळे नाट्यप्रयोग सादर करताना येणार्या अडचणींना लवकरच आळा घालण्याच्या दृष्टीने पालिका सभागृह व केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नाट्यगृहात जॅमर बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मोबाईल जॅमर बसवण्याआधी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार मुंबईकरांकडून 30 दिवसांच्या आत हरकती सूचना मागवल्या आहेत . नागरिकांच्या हरकती सूचनांची दखल घेत पालिकेच्या मालकीच्या नाट्यगृहात मोबाईल जॅमर बसवण्यात येतील , असे एका अधिकार्याने सांगतिले. नाट्यगृहामंध्ये नाटक सुरू होण्यापूर्वी मोबाईल ’सायलेंट’ किंवा ’स्वीच ऑफ’ करण्याच्या सूचना केल्या जातात. त्यानंतरही अनेक वेळा नाटकाचे प्रयोग सुरू असताना मोबाईलच्या रिंग वाजल्याने नाट्यकलावंत भरत जाधव, विक्रम गोखले, सिद्धार्थ जाधव, सुमित राघवन, सुबोध भावे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारानंतर नाट्यगृहात जॅमर बसवण्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीला पाठिंबा म्हणून विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी पालिकेच्या सभागृहात ठरावाची सूचना मांडली. सभागृहात ही ठरावाची सूचना मंजूर झाल्यावर पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आली. आयुक्तांनी त्यावर अभिप्राय देताना महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन जॅमर बसवावेत किंवा कसे याबाबत 30 दिवसांच्या कालावधीमध्ये नाट्यनिर्माते, संस्था यासह नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले आहे.