Breaking News

अकोले एमआयडीसी हा पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट आमदार किरण लहामटे यांची माहिती


अकोले/ तालुका प्रतिनिधी ः
अकोले येथे एमआयडीसी विकसित करणे हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.
त्यांनी अकोलेत याबाबत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, अकोले एमआयडीसीचा प्रश्‍न लवकरच सोडवणार आहे. तो आमचा ब्लू प्रिंटमधील मुख्य मुद्दा आहे. अलीकडेच झालेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीचे 120 कोटी रुपये तालुक्यास
मिळाले आहे. अतिवृष्टीची नुकसानभरपाई म्हणून 20 कोटी रुपये तालुक्यातील शेतकरी बांधवांस मिळणार आहेत.
अकोलेच्या एमआयडीसीप्रश्‍नी उपमुख्यमंत्री अजित पवार व महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विशेष लक्ष घातले आहे. तालुक्यात पर्यटन विकासाबाबत आपण स्वतः लक्ष घालणार आहे, असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे, असेही आमदार लहामटे यांनी सांगितले. आमदारांची राहुटी हा उपक्रम तालुक्यात 20 मार्चपासून राबवण्यात येणार आहे. संगमनेर तालुक्यातील व अकोले विधानसभा मतदारसंघातील पठार भागात दर महिन्याला जनता दरबार घेणार आहे. शहापूर-गेवराई रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अकोले विधानसभा मतदार संघात सामान्य जनता व माझा यापुढे थेट संवाद राहील. पक्ष विरहित भरपूर लोकांनी मला मदत केली आहे.
चार महिन्यात 70 ते 80 कोटींची कामे मार्गी लागली आहेत.
 जनतेच्या कामासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाहीदेखील आमदार लहामटे यांनी दिली. तोलारखिंड, देवीचा घाट, औद्योगिक वसाहत, ग्रामीण रुग्णालयाला
उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, अप्पर आंबित, बिताका प्रकल्प, कळसूबाई रोपवे,
 पिंपरकणे उड्डाण पूल आदी महत्त्वाच्या 12 प्रमुख कामे मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.