Breaking News

पाथर्डीच्या उपनगराध्यक्षपदी नंदकुमार शेळके यांची निवड सविता भापकर यांना चार मते


पाथर्डी/ प्रतिनिधी ः
पाथर्डी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शुक्रवारी नंदकुमार शेळके यांची निवड करण्यात आली. ते सत्ताधारी भाजपचे गटनेते आहेत. त्यांना एकूण 13 मते पडली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार्‍या राष्ट्रवादीच्या नगरसेवक सविता भापकर यांना चार मते पडली.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश बोरुडे अनुपस्थित होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवक भापकर व भाजपचे गटनेते शेळके यांचे अर्ज छाननीदरम्यान वैध ठरवण्यात आले.
दरम्यान विरोधकांनी गुप्त पद्धतीने मतदान करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्याकडे केली. परंतु शासन नियमानुसार हे करता येणार नाही, असे केकाण म्हणाले. उमेदवाराचे नाव घोषित केल्यानंतर ज्यांना मतदान करायचे आहे त्यांनी हात उंचावून मतदान करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार नगरसेवक सविता भापकर यांना 4 मते तर शेळके यांना 13 मते पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
        सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी काम पाहिले. दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत निवडणूक अर्ज दाखल करण्यात आले.
          उपनगराध्यक्ष बजरंग घोडके यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर या पदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु अखेर शेळके यांची वर्णी लागली.
 निवडीनंतर नगरसेवक प्रसाद आव्हाड मित्र मंडळाच्या वतीने नूतन उपनगराध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. आमदार मोनिका राजळे यांनी पंचायत समितीच्या निवडीप्रमाणेच नगरपालिकेतही समतोल साधला असल्याचे बोलले जात आहे.