Breaking News

करोनाची चिंता करण्यापेक्षा काळजी घ्यावी वैद्यकीय अधिकारी खेडकर यांचे आवाहन


धामणगाव/ प्रतिनिधी ः
करोना या आजाराचा धसका घेण्यापेक्षा त्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैभव खेडकर यांनी केले.
खेडकर म्हणाले, करोना व्हायरसमुळे संपूर्ण जनता चिंताग्रस्त झाली आहे. परंतु त्यामुळे चिंताग्रस्त होण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. करोनाचा व्हायरस 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानापुढे जिवंत राहू शकत नाही. आपल्या परिसराचे तापमान सध्या उन्हाळा असल्यामुळे हळूहळू वाढत आहे.
तापमान सहज 30 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार आहे. याचबरोबर आपण खबरदारी म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे. जेवणाच्या अगोदर किमान वीस सेकंद डेटॉल साबणाने हात स्वच्छ धुवावे. शक्यतो प्रवास टाळावा. मटन इत्यादी पदार्थ चांगले शिजवून आणि गरम करून खावेत. सकस आणि नियमित आहार घेतल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. त्यामुळे या व्हायरसचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. अफवांवर विश्‍वास ठेवू नये. घाबरून जाऊ नये. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. सर्दी, खोकला होणे, घसा जास्त दुखणे, ताप येणे यावर औषधोपचार घेऊनही फरक न पडल्यास सौम्य, मध्य आणि तीव्र या प्रकारानुसार रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, असेही खेडकर यांनी सांगितले.