Breaking News

आर्थिक मंदी आणि त्यात आला कोरोना! पण सामान्यांची येईना कोणाला करुणा!


गेल्या अनेक वर्षांपासून भारतात जागतिक मंदी असे चित्र रंगविले जायचे. कोणाला हातउसने पैसे जरी मागितले, तरी तो आर्थिक मंदीचे कारण सांगायचा. बँकांकडे पदर पसरावा तर बँकांची ठरलेली आणि ठेवणीतली उत्तर ऐकायला मिळतात, 'बजेट संपले, नवीन आले, की या'. अर्थात ते केव्हा येते आणि केव्हा संपते, याचा सामान्य माणसाला काहीच मेळ लागत नाही. हे कमी म्हणू की काय, सामान्यांच्या ऊरावर बसायला आता कोरोना आलाय. मात्र अशा विचित्र अवस्थेत सामान्य माणसाची कोणाला तरी द्या येईल का, हा खरा प्रश्न आहे.
जगाच्या नकाशात एकदम छोटा दिसणारा चीन हा देश, जगातल्या बलाढ्य देशांच्या तुलनेत त्याची लोकसंख्या कमी, त्याचे क्षेत्रफळ कमी, दरडोई उत्पन्न कमी. पण या देशाने संपूर्ण जगाची झोप उडवून दिली आहे. या देशातून आलेल्या कोरोना व्हायरसने जगात भितीचे वातावरण पसरले आहे. हजारो लोक या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. संपूर्ण जग या आजाराशी मुकाबला कसा करायचा, यावर उपाययोजना काय आणि कशा करायच्या या विचारचक्रात गुंतले आहे. चीन हा देश किती उपद्रवी आहे, याची आपल्या भारतीयांना आणि या देशातील प्रत्येक नागरिकाला वेळोवेळी अनुभूती आलेली आहे, येत आहे. चायना मांजामुळे दरवर्षी अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. अनेकांचे गळे कापले जातात. पण त्या चायना मांजावर काही बंदी येत नाही आणि पक्षी मरायचे तसेच गळे कापायचे कमी होत नाही. आता याच चीनने सोडलेल्या कोरोनामुळे हजारो मृत्यमुखी पडले असून अनेकांच्या मनात भीतीचा गोळा उठला आहे. सामान्य नागरिकांना या संकटातून सावरण्यासाठी देशाचे, राज्याचे सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था मानसिक आधार देत आहेत. घाबरू नका पण काळजी घ्या, असे आवाहन केला जात आहे. मात्र हे जरी खरे असले तरी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाला रोखण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत म्हणजेच शहरी क्षेत्रातील सर्व सरकारी तसेच खासगी शाळा-महाविद्यालयांना दि. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय मॉल्सदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, यामध्ये मॉल्समधील जीवनावश्यक वस्तूंचा विभाग मात्र सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दहावी-बारावी तसेच महाविद्यालयीन परीक्षा मात्र विहित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ वर गेली आहे. यात पुण्यातील १०, मुंबई , पनवेल कामोठे , नवी मुंबई , कल्याण , नागपूर , अहमदनगर , ठाणे आणि यवतमाळ अशा रुग्णांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत नुसतेच कोरडी माया सामान्यांच्या काय कामाची? पण यातून सावरण्यासाठी दि. ३१ मार्चपर्यंत काळजी घ्या, गर्दीत जाऊ नका, मंदिरात जाऊ नका, अशा मौलिक {?} सूचना दिल्या जात आहेत.
चौकट
घरात बसून अर्थव्यवस्था कशी बळकट होईल?
कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी घरात बसा, गर्दीत जाऊ नका, मंदिरे बंद, परिणामी रस्त्यावर शुकशुकाट. घरातून बाहेर पडायचे नाही, मग काम धंदा कोण करणार, घरात चार पैसे कसे येणार?  कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून मंदिरे, चर्च, मशिदी बंद. पण लोकच आलीच नाही तर चलन कसे फिरणार? मंदिराच्या परिसरात हार फुले विकणारांच्या चुली कशा पेटणार? अर्थात एक बाजूने मंदिरे बंद करण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे, यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही.  मग नुसते घरात बसून राज्याची आणि प्रत्येकाच्या घराची अर्थव्यवस्था कशी काय बळकट होणार, हा खरा प्रश्न आहे.