Breaking News

राज्यात हवामानात बदल

दिवसा कडक ’ऊन’ तर रात्री ’गारवा’
पुणे : राज्यभरात मागील पंधरवड्यापासून सातत्यान हवामानाची स्थिती बदलत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. दिवसा कडक उन आणि रात्री गार वारा सुटत असल्याने नागरिकांना किरकोळ आजारांना सामोरे जावे लागत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस कोकण विभागात तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढला होता. त्याचवेळी मध्य महाराष्ट्रात थंडी
होती, तर विदर्भ आणि मराठवाड्यात 
पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सर्वच भागांमध्ये दिवस आणि रात्रीच्या तापमानात घट झाली. सर्वच ठिकाणी तापमान सरासरीखाली आले. सद्य:स्थितीत कमाल आणि किमान तापमानात रोजच चढ-उतार सुरू आहेत. अनेक ठिकाणी अद्यापही तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने रात्री आणि पहाटे गारवा जाणवतो आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होत असून, या भागात 16 ते 18 मार्च या कालावधीत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई आणि परिसरात सध्या दुपारी कडक ऊन  आणि पहाटे थंडी असे हवामान आहे. उत्तरेकडून थंड वार्यांचे प्रवाह सुरू असून अरबी समुद्रावरून वारे वाहत असल्याने राज्याच्या बहुतांश भागात रात्री गारवा आहे. दिवसाच्या कमाल तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. मागील मराठवाड्याभरात मुंबईचे कमाल तापमान 30 अंशापेक्षा अधिक आणि किमान तापमान 20 अंशापेक्षा कमी होते. रविवारी किमान आणि कमाल तापमानात एक ते दीड अंश सेल्सिअसची तर कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. कोकण विभागात मुंबई, रत्नागिरी आदी भागात सध्या दिवसाचे तापमान सरासरीपुढे जाऊन उन्हाचा चटका वाढला असला, तरी रात्रीचे तापमान सरासरीखाली असल्याने गारवा आहे. मध्य महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी रात्री गारवा जाणवतो आहे. पुणे, नाशिक, सातारा, जळगाव आदी भागात रात्री थंड वारे वाहत आहेत. नाशिक येथे रविवारी राज्यातील नीचांकी 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात रात्री आणि दिवसाचे तापमान अद्यापही सरासरीखाली आहे. विदर्भातही सर्वच ठिकाणी दिवसा आणि रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली असल्याने उन्हाचा चटका कमी आणि रात्री गारवा, अशी स्थिती आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर आदी भागात रात्री थंडी जाणवते आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 16 ते 18 मार्च या कालावधीत विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 17 आणि 18 मार्च या कालावधीत विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाटयाच्या वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे असेल.