Breaking News

दिल्लीतील हिंसाचाराला भाजप आणि आरएसएस जबाबदार वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका


पंढरपूर : दिल्ली हिंसाचाराप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित असून, ती दंगल आरएसएस व भाजपने घडवली आहे. यामुळे पुन्हा दंगल झाली तर आश्‍चर्य मानू नका, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते पंढरपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
आंबेडकर पुढे म्हणाले की, दंगलीमध्ये सैनिकांचे गणवेश परिधान करून इतर लोक घुसल्याचे पोलिस व राजकीय नेते सांगतात. एका अहवालानुसार 25 लाख सैनिकी गणवेश कोणीतरी विकत घेतले आहेत. याची माहिती सरकारने काढणे गरजेचे आहे. या सर्व घटनेवरून पुन्हा दंगल झाली तर आश्‍चर्य वाटणार नाही. देशात 431 ठिकाणी शाहिनबाग आंदोलन घडतंय. मात्र याचे वार्तांकन होत नाही. हे आंदोलन असेच चालू राहील. आसाममध्ये 19 लाख लोक निर्वासित झाले आहेत. ते त्यांची नागरिकता सिध्द करू शकले नाहीत. त्यात 14 लाख 20 हजार हिंदू आहेत. त्यामुळे या कायद्याचा फटका दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना बसणार आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले. सोलापूरचे खासदार जयसिध्देश्‍वर महास्वामी कोर्टात लढत खासदार म्हणून पाच वर्षे काढतील, असा दावाही त्यांनी केला. खासदार जयसिद्धेश्‍वर महाराज यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. खासदार जयसिद्धेश्‍वर महाराज यांनी आता याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या बजेटमध्ये केंद्राकडून 8 हजार कोटींचा निधी येणार अशी माहिती देण्यात आली. पण, केंद्राने 8 हजार कोटींचा निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे या बजेटमध्ये एकूण 16 हजार कोटींची तूट असून मागच्या सरकारने ते लुटले. त्याच्या आधीच्या सरकारनेही लुटले, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.