Breaking News

कोरोनाची लक्षणे आढळल्यास काय करावे?

आरोग्य मंत्रालयाकडून जनजागृती मोहीम
मुंबई : कोरोनाबाबत जनतेच्या मनात भीती आणि काही गैरसमज आहेत. त्यामुळे याबाबत जनतेला योग्य ती माहिती मिळणे आणि शिक्षण होणे गरजेचे आहे असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयानं जनजागृती मोहीम राबवली आहे. देशात कोरोना विषाणूचे 73 बाधित आहे तर राज्यात हा आकडा सध्या 11 वर आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यास सर्वप्रथम काय करावं?  रुग्णालयात जावं की घरी राहावं? कोणत्या रुग्णालयात जावं? असे अनेक संभ्रम लोकांच्या मनात आहेत. देशात आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते रुग्ण परदेशात प्रवास करुन भारतात आले आहेत किंवा कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही परदेशातून प्रवास करून आलात किंवा अशा  व्यक्तींच्या संपर्कात आलात आणि तुमच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची प्रमुख लक्षणं आढळली असतील तर त्वरीत तपासणी करा. कोरोनाची चाचणी केल्यानंतर 14 दिवस त्या व्यक्तीस देखरेखीखाली ठेवले जाते. आरोग्य मंत्रालयानं  प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाइन क्रमांक पुरवले  आहेत. विशेष म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करताना सुरु होणार्‍या सुचनांच्या शेवटी हा हेल्पलाइन क्रमांक ऐकू येतो. या हेल्पलाइन क्रमांकवर फोन केल्यास तुम्हाला कोरोनाच्या चाचणी आणि उपचारांसंदर्भात मदत प्राप्त होईल. त्याचप्रमाणे पुण्यात नायडू आणि मुंबईत कस्तूरबा रुग्णालयात उपचारांसाठी स्वतंत्र्य कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज नाही मात्र प्रत्येकानं सतर्क राहून खबरदारी जरूर घेतली पाहिजे. जर डिसेंबर ते मार्च या काळात तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातील व्यक्ती चीन, इटली, कोरिया, इराण किंवा  अन्य मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित देशातून परतली असेल आणि काही दिवसांत त्यामध्ये वरील लक्षणं आढळू लागली तर त्वरित हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून उपचार घ्या.
‘कोरोना’ जगातील 100 पसरला आहे. चार हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या या आजाराने मृत्यू झाला आहे. करोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 4 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटने (थकज) ने कोरोना व्हायरसने जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केले आहे. कोरोनाविरोधात जगाने आता एकजूट होऊन लढावे, असे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेनं केले आहे. दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 11 रुग्ण आढळले आहेत. पुण्यानंतर, मुंबई आणि नागपूरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळलेत. केरळमध्ये कोरोनाचे 8 नवे रुग्ण आढळलेत. उत्तर प्रदेशात 9 जणांना करोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. दिल्ली आणि राजस्थानमध्ये 1-1 असे आणखी दोन नवीन रुग्ण आढळलेत. कोरोनाच्या प्रसाराचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून 15 फेब्रुवारीनंतर येणार्‍या प्रवाशांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. 15 एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसाही सरकारने बंद केला आहे. हा निर्णय 13 मार्चपासून लागू होणार आहे. एअर इंडियाने दक्षिण कोरियाला जाणारी उड्डाणे 25 आणि इटलीची उड्डाणे 28 मार्चपर्यंत रद्द केली आहे.


चौकट . . . . .
कोरोनाची लक्षणे काय?
ताप, श्‍वास घेण्यास त्रास होणे, कफ, छातीत दुखणे, सर्दी, डोकेदुखी,  थकवा जाणवणे, न्यूमोनिया ही काही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत.

चौकट . . . . .
काय खबरदारी घ्याल
- साबण, पाणी किंवा हँड सॅनिटायझरनं हात स्वच्छ धूवा
- खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा
- टिश्यू वापरला असेल तर तो लगेच फेकून द्या, हात स्वच्छ धुवा
- हात स्वच्छ न धुता डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळा
- आजारी व्यक्तींच्या संपर्कात जाणं टाळा.

चौकट . . . . .
. . . तर घरी थांबा !
परदेशातून परतला नसाल किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कातही तुम्ही आला नसाल मात्र वरील लक्षणं तुमच्यामध्ये आढळली असतील तर अशा व्यक्तींना आरोग्य मंत्रालयानं घरी थांबण्याची सूचना केली असेल. ताप किंवा ही लक्षणं कमी झाली तर घाबरण्याची आवश्यकता नाही अन्यथा उपचार घेणं गरजेचं आहे.