Breaking News

कुकडी पाटबंधारेच्या कर्मचार्‍याला लाच घेताना अटक एक हजार रुपये स्वीकारले


कोळगाव/प्रतिनिधी :
श्रीगोंदे कुकडी पाटबंधारे विभागातील आरेखक विभागाच्या कर्मचार्‍याला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
वसंत नानासाहेब सकट (वय 54) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. तो श्रीगोंद्यातील कुकडी पाटबंधारे कार्यालय क्रमांक दोनमध्ये नोकरीस आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथील आजोबांच्या नावावर असलेली शेतजमीन पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्राखाली येत नसल्याचा दाखल देण्यासाठी सकट यांनी लाचेची मागणी केली होती. दौंड येथील या व्यक्तीने याबाबत लाचलुचपत विभागाला माहिती दिली होती. या माहितीनुसार श्रीगोंदे येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या आवारात पोलिस अधीक्षक सुनील कडासने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे, नाशिक परिक्षेत्र लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनात सापळा लावण्यात आला. दौंड येथील व्यक्तीकडून वसंत सकट यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्याम पवरे, पोलिस निरीक्षक दीपक करांडे यांनी ही कारवाई केली.